गोवा कला अकादमीच्या 53व्या ‘ब’ गट मराठी नाटय़स्पर्धेत शुक्रवारी हळर्ण-पेडणे येथील शिवम् स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब यांनी प्रा. डॉ. वैशाली संजय नाईक यांची ‘रणरागिणी’ ही ऐतिहासिक नाटय़कृती सादर केली. चौदाव्या शतकातील चित्तौडची महाराणी पद्मीनी तथा पद्मावती हिच्या संघर्षमय आयुष्याची उकल आणि स्त्री सन्मानासाठीचा तिचा प्राणत्याग हा धागा पकडून या नाटय़ाची उभारणी झालेली आहे. एक देखणा प्रयोग रसिकांना अर्पण करण्याचा सकारात्मक प्रयत्न, हे नाटक बघताना जाणवला…..

राजा गंधर्वसेनाची मुलगी आणि चित्तौडचे सम्राट रतनसिंग यांची रजपूत पत्नी महाराणी पद्मीनीचे अनुपम, अलौकिक, मनोहारी लावण्य हा प्रशंसेचा आणि रसिकत्वाचा विषय होता. दरम्यान, सुल्तानी परंपरेच्या अल्लाउद्दीनने आपले काका खिलजी राजवंशाचे संस्थापक जलालुद्दीन खिलजी यांचा कपटाने वध करून दिल्लीची गादी हडप केली. त्यानंतर एका मागोमाग एक अशी आक्रमणे करून त्याने अनेक साम्राज्ये उद्ध्वस्त केली. महाराणी पद्मीनीच्या मोहक सौंदर्याबद्दलची माहिती मिळताच तो तिच्या प्राप्तीसाठी वेडापिसा होतो. रतनसिंगाकडे तो तिची मागणी करतो. शेवटी आपले राज्य सुरक्षित राहावे, यासाठी रतनसिंग तडजोड करतो. पद्मीनीचे सौंदर्य आरशामधून प्रतिबिंबात्मक पद्धतीने अल्लाउद्दीनला दाखविण्याचे ठरते. याला पद्मीनी विरोध करते पण तिची शक्ती कमी पडते. पद्मीनी मुळातच शूर होती. युद्धकौशल्य तिच्याकडे होते. ती अल्लाउद्दीनचा गनिमी कावा ओळखते. मध्यंतरी अल्लाउद्दीन तिचे पती रतनसिंग यांना बंदी बनवितो. शेवटी एका बेसावध क्षणी अल्लाउद्दीनच्या सैन्यावर आक्रमण करून ती आपले पती रतनसिंग यांना अल्लाउद्दीनच्या तावडीतून सोडवून आणते.
स्वतःच्या पत्नीचा सौदा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रतनसिंगना पश्चाताप होतो. शेवटी सर्व शक्ती पणाला लावून रतनसिंग आणि त्याचे सैन्य अल्लाउद्दीनच्या सैन्याचा प्रतिकार करतात. त्यामध्ये अनेक पुरुष मारले जातात. त्यांच्या सगळय़ा स्त्रिया सती जातात. राणी पद्मीनीही सती जाते. शेवटपर्यंत ती आपले पतिव्रत्य सांभाळते. अशी ही रणरागिणीची कथा या नाटकात विस्ताराने मांडलेली आहे.
हे नाटक बघताना जुने पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग आठवले. पुन्हा पुन्हा प्रवेश पडदा टाकून कथानकामधील वेगवेगळे प्रसंग नाटय़ाच्या माध्यमातून आवश्यकतेनुरुप विविध भागातून सादर करण्याची पद्धत नाटय़लेखिकेने अवलंबिलेली आहे. अर्थातच ती अनिवार्य आहे का? त्यावर सोयीस्कर मार्ग काढणे शक्य आहे का? यावर विचार व्हायला हवा. अर्थातच दुसऱया अंकात रंगमंचाचा एक भाग प्रकाशमान करून दुसरा भाग ब्लॅकआऊट ठेवून नाटय़ पुढे रेटण्याचा प्रकार योग्य वाटला. जो वेळेची बचत करणाराही होता. नाटक ही सुटसुटीत प्रक्रिया असावी, ही रसिकांची अपेक्षा असल्यास नवल नाही.
राज परब यांनी रतनसिंगची भूमिका समजून उमजून केली. त्यांची देहयष्टी भूमिकेला साजेसी होती. अल्लाउद्दीनच्या भूमिकेतील मकरंद परब यांचा रंगमंचावरील वावर संयुक्तिक वाटला. ज्ञानेश्वर परब (मलीक), प्रशांत परब (महावीर सिंग), चंद्रकांत परब (लखमसी), स्मितराम परब (चारण), प्रेमानंद परब (वीरसिंह), आत्माराम परब (देवनाथ), विश्वजित परब (बादल), वैष्णवी नाईक (कोयल), रिवा गावस (दर्शना), अनोखी परब (वैजयंती), सुकाजी परब (द्वारपाल) यांनी आपापल्या वाटय़ाला आलेल्या छोटय़ा-मोठय़ा भूमिका जिद्दीने केल्या. अर्थातच सांघिक भावना प्रत्येक कलाकाराच्या ठिकाणी दिसल्या. भिमा परब यांची पद्मीनीची भूमिका चांगली वठली. कमल कुमारी झालेल्या तेजश्री परब यांचे प्रयत्नही नेटके होते. तरीसुद्धा पूर्ण वाक्य एकाच श्वासात फेकल्यास त्याचे परिणाम प्रभावी वाटतात. पद्मीनी आणि कमलकुमारीचे पाठांतर चांगले होते परंतु पूर्णविरामावर थांबणे आणि स्वल्पविरामानंतरचे शब्द खुबीने उच्चारणे, याबद्दल त्यांना अवगत करणे गरजेचे होते. स्पर्धात्मक रंगभूमी आणि उत्सव रंगभूमी यातला फरक त्यांचे भाषण ऐकताना एक सामान्य रसिक म्हणून मला जाणवला.
या नाटकांत वापरण्यात आलेले सैनिक आणि शिस्तबद्ध युद्धप्रसंग हा खऱया अर्थाने रसिक रंजनाचा भाग ठरावा. नाटकातील सगळेच मॉबसीन झक्कास होते मात्र शेवटी अग्नीप्रवेश केल्यानंतर सरपटत विंगेत जाणाऱया सतींचे पारदर्शक पडद्यामधून घडलेले दर्शन टाळणे शक्य होते.
स्थिर नेपथ्याचा मकरंद परब यांनी केलेला विचार योग्यच होता. प्लॅटफॉर्मस्ची मांडणीही दिग्दर्शक आणि नेपथ्यकाराच्या डोळस बुद्धिची साक्ष देणारी होती. एकूणच नाटय़ काही अपवाद वगळल्यास दिग्दर्शक निलेश नाईक यांच्या परिपक्वतेची साक्ष देणारे दिग्दर्शन होते. नाटकातील पार्श्वसंगीत वातावरण निर्मितीसाठी पोषक वाटले. प्रशांत परब यांची रंगभा प्रभावी होती. वेषभूषा चमकदार होती. नाटकातील असंख्य पात्रांची वेषभूषा आणि केशभूषा तीही वास्तवदर्शी. म्हणूनच वेषभूषाकार हंसराज परब कौतुकास पात्र आहेत. तुलनात्मकदृष्टय़ा स्पॉट्स, फ्लडलाईट, फूटलाईट्स, डिमर्स नाटकचा स्वाद वाढविणारे होते. नाटय़लेखनही काही अपवाद वगळल्यास कसदार असेच आहे. खासकरून नाटकातील संवादांना सौंदर्य आहे. एकूणच नाटय़प्रयोग देखणा होता.
– दुर्गाकुमार श्रीकृष्ण नावती









