प्रतिनिधी, सेनापती कापशी
मूळक्षेत्र मेतगे येथे स्वतः श्री संत सद्गुरु बाळूमामा यांनी स्थापन केलेला रणखांब श्रावण महिन्याच्या निमित्ताने रविवार (दि. २० )ऑगस्ट ते दि. १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत खुला करण्यात येणार आहे.अशी माहिती श्री सद्गुरु बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पापा पाटील-कौलकर यांनी दिली.
पंधरा वर्षानंतर गतवर्षी श्रावण महिन्यात आणि यावर्षी अधिकमास असल्यामुळे रणखांब खुला करण्यात येणार आहे.भक्तांच्या इडा-पिडा दूर व्हाव्यात म्हणून सन २९३२ मध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा यांनी स्वतः या १४ फुटी रणखांबाची स्थापना केली होती. त्यावेळी बाळूमामांनी ‘एक खांब कैलासात आणि दुसरा खांब पृथ्वीतलावर बाळाप्पा धनगरचा मेतग्यात’ याशिवाय तिसरा खांब असणार नाही, अशी गर्जना केली होती.आजही येथे येणारे भाविक या खांबाचे दर्शन घेऊन खांबा भोवती फेऱ्या मारतात. तसेच यावेळी त्यांनी नाथांची मूर्ती व पादुकांचे पूजन करून भंडारा उत्सवही सुरू केला होता. तोच भंडारा उत्सव आजही मेतगे येथे मोठ्या उत्साहाने करतात.
२००७ मध्ये या रणखांबाची झीज होऊ नये,म्हणून त्यावर पंचधातूचे आवरण चढवले होते. त्यामुळे मूळ खांब या पंचधातूच्या आवरणामध्ये झाकला गेल्याने त्याचा भक्तांना थेट स्पर्श होत नव्हता. म्हणूनच गतवर्षी हा रणखांब खुला करण्यात आला होता. यावर्षी देखील हा रणखांब खुला करण्यात येत आहे. या रणखांबावर अभिषेक सुद्धा घालण्यात येणार आहे. या श्रावण महिन्याच्या निमित्ताने दररोज मंदिरामध्ये सकाळी सात वाजता सद्गुरूंची आरती, साडेसात वाजता संकल्प गणेश पूजन, साडेआठ वाजता गंगापूजन, दहा वाजता प्रधान देवता पूजन व रणखांबावर अभिषेक असा रोजचा दिनक्रम असणार आहे.