सत्ताधारी काँग्रेसमध्येच धुमश्चक्री, इमारत पाडण्याची मागणी, प्रचंड जनक्षोभही
वृत्तसंस्था / सिमला
हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथील संजौली भागात निर्माण करण्यात आलेल्या मशिदीवरून त्या राज्यात प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. या मशिदीची उभारणी बेकायदेशीर असून ती इमारत पाडण्यात यावी, अशी लोकांची मागणी आहे. लोकांच्या दबावामुळे राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षातच या प्रश्नावरून दुफळी माजल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षानेही काँग्रेसला धारेवर धरले असून काँग्रेसचे बोटचेपे धोरण उघड झाल्याचा आरोप केला आहे.
हिमाचल प्रदेश वक्फ मंडळाने या वादग्रस्त मशिदीचा शुक्रवारी ताबा घेतला असून त्यामुळे वातावरण आणखी तापले आहे. या मशिदीच्या सध्याच्या इमामाला कामावरून काढून टाकण्यात आल्याची घोषणा वक्फ मंडळाने केली. या मशिदीच्या बाहेर गेले दोन दिवस प्रचंड निदर्शने आणि आंदोलने होत आहेत. हजारो लोकांनी मशिदीला घेराव घातला असून ती पाडण्याची मागणी केल्याने राज्य सरकारची कोंडी झाली. लोकांच्या दबावामुळे इमामाची हकालपट्टी करण्यात आली आहे.
हिंदू संघटनांची निदर्शने
हिमाचल प्रदेशातील हिंदू संघटनांशी या मशिदीला विरोध केला असून प्रचंड मोर्चाचे आयोजन शुक्रवारी केले. हिमाचल प्रदेशमधील शांतता धोक्यात आणण्याचा डाव मशिदीचे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांनी रचला असल्याचा आरोप या संघटनांनी केला. घुसखोरांना राज्यात सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोपही हिंदू संघटना आणि इतर संघटनांनी केला आहे.
बाहेरून आलेल्यांमुळे वाद
या मशिदीच्या परिसरात हिमाचल प्रदेशात बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी अनेक बेकायदा बांधकामे केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वक्फ मंडळाने ही सर्व बांधकामे पाडविण्याचा आदेश दिला. तसेच कोणत्याही बाहेरच्या मुस्लिमाला या मशिदीत स्थान देऊ नये, असा आदेशही काढण्यात आला आहे.
मशीदच बेकायदा
ही पूर्ण मशीदच बेकायदा आहे, असा आरोप आंदोलकांच्या नेत्यांनी केला आहे. हिमाचल प्रदेशात अलिकडच्या काळात बांगलादेशी मुस्लीम आणि रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी चालविली असून सरकारी जमिनींवर बेकायदा कब्जा करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप केला जात आहे. संजौली मशीद पाडविण्यात यावी आणि बाहेरून आलेल्या मुस्लिमांना घालवून देण्यात यावे, अशी मागणी अनेक संघटनांनी केली असून राज्य सरकारवर दबाव आणला आहे.
काँग्रेसमध्ये दोन तट
या मशिदीच्या प्रश्नावरून काँग्रेसमध्ये उघड दुफळी माजली आहे. ही मशीद बेकायदा असल्याचा आरोप एका गटाने केला असून मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी मशिदीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर दुसऱ्या गटाने ही वक्फ मंडळाची मालमत्ता असून मशीद वैध असल्याचा दावा केला. काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील नेते रशीद अल्वी यांनी मशिदीचे समर्थन करत आपल्याच पक्षातील मशिद विरोधकांवर टीका केली आहे. राज्यात काँग्रेस सरकार असतानाही मशिदी धोक्यात येत असतील, तर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात फरक काय उरला, असा प्रश्न विचारला आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून प्रश्न लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
मंत्र्यांचे आश्वासन
हिमाचल प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री अनिरुद्ध सिंग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसमधील दुफळी उघड झाली. कोणतेही बेकायदा बांधकाम आम्ही उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी उघड भाषा त्यांनी केली. मात्र, ही मशीद बेकायदा नसून ती अत्यंत जुनी असल्याचा दावा काँग्रेसचेच रशीद अल्वी यांनी केल्याने पक्षांतर्गत वादाची ठिगणी पडल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री सुक्खू दोन्ही गटात समझोता घडविण्याच्या तयारीत आहेत, मात्र, आत्तापर्यंत त्यांना अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.









