असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सतर्फे पर्यावरणपूरक विकासासाठी सर्व्हेक्षण : पालकमंत्री सतेज पाटील 30 लाख रूपयांच्या निधीची ग्वाही
प्रतिनिधी/ कोल्हापूर
रंकाळा तलावाच्या पश्चिम-दक्षिण दिशेला असणाऱया खणीचे लवकरच रूपडे पालटणार आहे. या खणीचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्सला तांत्रिकदृष्टय़ा सर्व अभ्यास करून पर्यावरण पूरक आराखडा तयार करण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
रंकाळा खणीवर पोहण्यासाठी दररोज तीन ते चार हजार लोक येत असतात. त्यांच्याकडून या खणीचे जतन, संवर्धन करण्याची मागणी होत होती. स्थानिक माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनीही यासाठी पुढाकार घेत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सकाळच्या प्रहरी या खणीला भेट दिली होती. रंकाळा खण विहार सेवाभावी मित्रमंडळतर्फे खणीचे संवर्धन व स्वच्छता याविषयी लक्ष घालण्याची विनंती केली. पालकमंत्र्यांनी विनंती मान्य करत खणीचे संवर्धन, स्वच्छता व पर्यावरण पूरक विकासासाठी तातडीने 30 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्सला तांत्रिकदृष्टय़ा सर्व अभ्यास करून पर्यावरण पूरक आराखडा तयार करण्याकरिता सांगितले. अध्यक्ष अजय कोराणे यांनी या सूचनेचा स्वीकार करत असोसिएशनचे सभासद आणि के.आय.टी. कॉलेजचे सिव्हिल विभाग प्रमुख प्राध्यापक मोहन चव्हाण व प्रा. शितल वरुर यांचेही संपर्क साधून अद्यावत अशा डि.जी.पी.एस. व टोटल स्टेशन उपकरणांचा वापर करत लेव्हल सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले. या कामात असोसिएशनचे माजी संचालक प्रदीप कुलकर्णी आणि अमरदीप मंडलिक यांचाही सक्रिय सहभाग आहे.
खणीतील पाणी शुद्धीकरणासाठी डॉ. जी. डी. यादव यांच्याशी चर्चा
कोल्हापूरचे सुपुत्र व इन्स्टिटय़ुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई संस्थेचे माजी कुलगुरू पद्मश्री प्रा. डॉ. जी. डी. यादव यांनी खणीतील पाणी शुद्धीकरणासाठी इन्स्टिटय़ुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई तर्फे ‘हायड्रोडायनॅमिक कॅविटेशन’ टेक्नॉलॉजी वापरून यंत्रणा बसवली आहे. या यंत्रणेबाबत कोराणे यांनी डॉ. यादव यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. डॉ. यादव यंत्रणा सुस्थितीत असून वीज बिलाची व्यवस्था केल्यास गरजेनुसार वापरता येईल असे सांगितल्याची माहिती कोराणे यांनी दिली. दरम्यान, डॉ. यादव यांनी या संदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशीही चर्चा केल्याचे सांगण्यात आले. डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे डीन (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव सहकार्य करत आहेत.
रंकाळा खणीच्या विकासाचा आराखडा तयार करताना पर्यावरणपूरकतेचे भान राखले जाईल. रंकाळ्याचे मूळ स्वरूपाशी सुसंगत असा नैसर्गिक पाण्यात पोहण्याचा आनंद देणारा एक आदर्श आराखडा तयार करण्याचा प्रयत्न आहे.
अजय कोराणे, अध्यक्ष असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स









