कोल्हापूर :
वाढदिवस, अभिनंदनाच्या फलकाआड दडलेली रंकाळा चौपाटी मुख्य बाजू गुरुवारी महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाने खुली केली. भल्या मोठ्या सहा फलकांनी गेल्या एक महिन्यापासून रंकाळा चौपाटीची ही बाजू झाकून गेली होती. चौपाटीच्या समोर आलेल्या पर्यटकांलाही रंकाळा दिसु शकत नव्हता. ‘तरुण भारत संवाद’मध्ये त्याचे छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाले आणि महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाने तातडीने फलक हटविले.
रंकाळा चौपाटीची ही मुख्य बाजू दगडी शिल्प सौंदर्याने नटलेली आहे. तेथे टॉवर आहे. भिंतीवर दगडी वेलबुट्टीची नक्षी आहे. वक्राकार दगडी पायऱ्या आहेत. चार्लस माँट या ब्रिटीश अभियंत्याने त्याचा आराखडा तयार केला आहे. अतिशय देखणा असा हा सारा परिसर. पण गेल्या काही वर्षात फक्त अभिनंदन, वाढदिवस शुभेच्छांच्या फलकांसाठी चौपाटीची ही बाजू वापरली जात आहे. रोज कोणाच्या ना कोणाच्या वाढदिवस त्यामुळे अतिशय रहदारीच्या या रस्त्यावर लोकांना आपले दर्शन व्हावे म्हणून ज्यांचा वाढदिवस तेच पदरच्या पैशाने हे फलक तेथे लावतात. व शुभेच्छा म्हणून मित्रांची नावे घालतात. काही फलकांवर तर गुंडगिरीचा आरोप असणाऱ्यांचेही फोटो ठळकपणे झळकले. यातला कोण समाजसवेक कोण गुन्हेगार हा भाग सोडा पण डिजीटल फलकांनी रंकाळा चौपाटीचा हा सुंदर कोपरा नक्कीच झाकून गेला. आज ‘तरुण भारत संवाद’मध्ये याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले. अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधिकारी विजय साळोखे यांनी गुरुवारी दुपारी हे फलक उतरवले व दडलेल्या चौपाटीला खुले केले.
रंकाळा परिसर कायम स्वरुपी फलकमुक्त हवा…
रंकाळा चौपाटीचा हा कोपरा फलकांसाठी बंदच केला पाहिजे. कारण येथे ‘अ’ ने फलक लावला की ‘ब’ ने फलक लावायचा अशी मोठी ईर्षा आहे. त्याला रंकाळा टॉवर परिसरातील वर्चस्ववादाची किनार आहे. त्यामुळे वर्षभर हा सुंदर कोपरा फलकांनी झाकलेलाच राहतो. व दुसऱ्याला तेथे फलक लावायला संधी मिळायला नको म्हणून आपला फलक महिना – महिनाभर तेथेच ठेवला जातो. विशेष हे की महापालिकेची परवानगी न घेता तेथे फलक उभारला जातो.








