टीसीएस विश्व 10 किमी धावण्यात अव्वल
बेळगाव : बेंगळूर येथे भारतीय अॅथलेटिक्स संघटना व विश्व अॅथलेटिक्स संघाटना मान्यताप्राप्त टीसीएस विश्व 10 किमी 50 ते 54 वयोगटात वरिष्ठांच्या मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावच्या रणजीत कणबरकर यांनी 38.24 इतक्या वेळे पूर्ण करुन प्रथम क्रमांक पटकावित बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 10451 स्पर्धकांनी भाग घेतला होता. टीसीएस स्पर्धेत रणजीत कणबरकर यश संपादन केलेले कर्नाटकाचे पहिले खेळाडू आहेत. बेंगळूर येथील कंटीरवा अॅथलेटिक्स मैदानावर आयोजित केलेल्या टीसीएस विश्व 10 किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत संपूर्ण देशातून जवळपास 10 हजारहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत बेळगावचे क्रीडा शिक्षक रणजीत कणबरकर यांनी भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावित बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांनी या स्पर्धेत 38.24 मि. इतका वेळ घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सुरेशकुमार यांनी 39.24 इतका वेळ घेत दुसरा क्रमांक पटकाविला. अशोकन शनमूगम यांनी 40.24 इतका वेळ घेत तिसरा क्रमांक, सुंदर छेत्री यांनी 40.28 इतका वेळ घेत चौथा क्रमांक तर रमेश एस. यांनी 41.26 इतका वेळ घेत पाचवा क्रमांक पटकाविला.
रणजीत कणबरकर हे सरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केले आहे. यापूर्वी अदानी अहमदाबाद मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, पुणे महा मॅरेथॉन, वसई-विरार मनपा मॅरेथॉन अशा अखिल भारतीय स्तरावरील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. 1993 साली अखिल भारतीय विद्यापीठ 5 हजार किमी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. त्यानंतर त्यांनी सतत सराव करीत आतापर्यंत विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन चमक दाखविली आहे. टीसीएल 10 किमी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रणजीत कणबरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना आरएलएस महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक जी. एन. पाटील व एएसआय एच. वाय. चचडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धडे गिरविले आहेत.









