तासगाव / सुनील गायकवाड :
ग्रामीण भागात दररोजच्या वापरात असलेली ताक करण्याची रवी, मुसळ व कंदील सव्वाशे वर्षांच्या या जुन्या वस्तू त्या समृद्ध काळातील आज्जी, पणजीनं वापरलेल्या वस्तू चिंचणीच्या रणजित पाटील यांनी जपल्यात. यासाठी आठ हजार रुपये खर्च करून त्यांनी घराच्या मध्यभागी जागा करून या वस्तू नव्या पिढीसाठी जपून ठेवल्यात.
जुन्या काळापासून माणसाने निर्माण केलेली साधने, हत्यारे काळाच्या प्रवाहात बदलत गेली. मागच्या पिढीतील या वस्तू पुढच्या पिढीसाठी दुर्मिळ होत गेल्या. या वस्तू वापरात नसल्याने त्यास कीड लागली. इतिहासकारांनी इतिहास लिहिले व ते पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक बनले. मात्र या पुरातन वस्तू लोप पावत गेल्या. यापुढे तरी मागील पिढीतील घरगुती वस्तू नवीन पिढीला पाहता याव्यात म्हणून तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील रणजीत पाटील हे प्रयत्न करत आहेत.
पाटील यांची परिस्थिती सामान्य आहे. ते इलेक्ट्रिशन म्हणून काम करतात. हे करत असताना त्यांना जुन्या वस्तू साठवण्याचा छंद आहे. चिंचणी येथे मातीच्या घरात ते राहात होते. पावसामुळे मातीच्या घराला नुकसान झाल्याने त्याच्या भिंती काढत असताना त्यांना रवी व मुसळ सापडले. याची घरात आज्जीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की माझी सासू या मुसळाने ताक करत होती.
यानंतर रणजीत पाटील यांनी या वस्तू घरी आनल्या. त्यावरील माती, कचरा साफसफाई करून पॉलिश पेपरने स्वच्छ करून त्यांना कलर लावला. व नवीन बांधलेल्या घरात बैठकीच्या खोलीत आठ हजार रुपये खर्च करून शोकेस केले. या ठिकाणी त्यांनी या वस्तू लोकांना दिसाव्यात अशा ठिकाणी ठेवल्या. जुन्या समृद्ध काळी रोजच्या वापरातल्या या वस्तू नव्या पिढीला समजाव्यात, त्या गोष्टींचे जतन व्हावे हा त्या वस्तू ठेवण्यामागील त्यांचा उद्देश होता. आता मिक्सरच्या जमान्यात रवी, मुसळ या गोष्टी गायब झाल्या तर अनेकांचे आयुष्य उजळणारा कंदील बॅटरीच्या प्रकाशात कधी विझला हे आम्हालाच कळालं नाही.
जुन्या काळचा समृद्ध वारसा व या वापरातील वस्तू हाताळणारी माणसे किती ताकतवान होती हे या वस्तूंवरून समजत आहे. छपराच्या मेढीला दोरी बांधून मडक्यात ताक घुसळणारी रवी ही फक्त आम्हाला जुन्या काळच्या चित्रपटात दिसत होती. मात्र अलीकडे लोकांच्या दारातील जनावरे गोठ्यातून गेली. ग्रामीण भागात ही अलीकडे पिशवीतून दूध आणणाऱ्या मंडळींची संख्या वाढत आहे. या लोकांना रवीचे महत्व कसे कळणार..? मात्र रणजीत पाटील यांनी जुन्या काळचा हा मौल्यवान ठेवा जपला असून तो नव्या पिढीने पाहण्या योग्य असाच आहे व तो तुम्ही आम्ही जपण्याची गरज आहे
- जुनी नाणी व नोटा जपण्याचा छंद
जुन्या वस्तू जपण्याचा छंद रणजीत यांना आहे. यातूनच त्यांनी पूर्वीच्या काळी वापरात असलेली पाच पैसे, दहा पैसे, वीस पैसे, पंचवीस पैसे ही नाणी तसेच जुन्या वापरातील नोटाही चांगल्या पद्धतीने जपून ठेवल्या आहेत त्या सर्वांनी पाहण्याची गरज आहे.








