ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजपनेच हा हल्ला घडवल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. आता भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच हा हल्ला भाजपचे षढयंत्र असेल तर मी खासदारकीचा राजीनामा देईन, असे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
नाईक-निंबाळकर म्हणाले, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. सुप्रिया सुळे हल्लेखोरांच्या पुढे नसत्या आल्या तर नक्कीच दुर्घटना घडली असती. शरद पवार यांच्या आम्ही राजकीय विरोधात असलो तरी ते महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व आहे. महाराष्ट्राचे नेते म्हणून नक्कीच आम्हाला त्यांचा आदर आहे. पवारांच्या घरावरील हल्ला जर भाजपने घडवून आणला असेल तर मी माझ्या खासदाकीचा राजीनामा देई, असे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, मला माझ्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संस्कृतीवर विश्वास आहे. भाजप असं कृत्य करुच शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.








