पारंपरिक वाद्य-डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली: गावागावांमध्ये लुटला रंगोत्सवाचा आनंद : एकमेकांना दिल्या शुभेच्छा
वार्ताहर/किणये
तालुक्यात बुधवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. पारंपरिक वाद्य, ढोल ताशा व डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसून आली. ग्रामीण भागातील गावागावांमध्ये पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तालुक्याच्या विविध गावांमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र होळीच्या सहाव्या दिवशी रंगपंचमी आली. गुरुवारी होळी, शुक्रवारी धुळवड तर सहाव्या दिवशी बुधवारी ग्रामीण भागामध्ये रंगपंचमीचा आनंद लुटला. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग खेळण्यास सुरुवात करण्यात आली.
दुपारी बारापर्यंत अवघा तालुका रंगात रंगून गेला होता. गल्ल्या-गल्यांमध्ये, गावच्या चौकात, गावच्या वेशीवर, कोपऱ्यावर रंग खेळण्याचे आयोजन तऊणांनी केले होते. बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वाद्यांचा व हलगीचा गजर सुरू होता. हलगीच्या गजरात हक्कदार व पुजारी यांनी सकाळी होळी कामण्णा व गावातील देवदेवतांची पूजा केली. त्यानंतर रंगोत्सवाला सुरुवात करण्यात आली. बऱ्याच गावांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून रंग खेळण्यास सुरुवात करण्यात आली. तर सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान रंगोत्सवाला अधिक उधाण आले होते. दुपारी बारा… साडेबारापर्यंत रंग खेळणे सुरूच होते. सध्या कडक उन्हाचे चटके बसत आहेत.
तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. त्यामुळे सकाळी 11 नंतर उष्णतेमध्ये वाढ झालेली पहावयास मिळाली. तरीही रंगोत्सवाचा उत्साह कायम होता. सध्या बऱ्याच गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे सुक्मया रंगाची उधळण करण्यावर अधिक भर देण्यात आला होता. तालुक्यातील पिरनवाडी, मच्छे, हलगा, बस्तवाड आदी गावांमध्ये धुलीवंदनाच्या दिवशीच रंगोत्सव खेळण्यात आला. तर उर्वरित गावांमध्ये बुधवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने व वेगवेगळ्या रीतीरीवाजाप्रमाणे होळी सण साजरा करण्याची परंपरा आहे.
काही गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी होळी पेटविण्यात आली. त्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच होळी कामण्णाजवळ सावरीचे व अन्य लाकूड उभारून त्याला आंबोती बांधण्यात आली होती. आंबोती बांधण्यासाठी केवळ जंगलातील वेलींचा उपयोग करण्यात आला होता. ही परंपरा बहुतांशी गावांमध्ये आजही जपण्यात आलेली आहे. तसेच काही गावांमध्ये शुक्रवारी सकाळी होळी कामाण्णाजवळ होळी रोवण्यात आली. यावेळी हलगीच्या गजरात बेंब मारण्यात आली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सामूहिक पद्धतीने पूजा करण्यात आली.
बहुतांशी गावांमध्ये शुक्रवारी दुपारनंतर धुळवड सण साजरा करण्यात आला. यावेळी बालचमुंनी गल्यागल्ल्यांमध्ये फिरून प्रत्येकाच्या घरासमोर माती टाकून धूळवडीचा आनंद लुटला. होळी सणानिमित्त ग्रामीण भागात सहा दिवस शेतकऱ्यांनी कडक वार पाळणूक केली. हे सहा दिवस शेतकऱ्यांनी आपल्या शेत शिवारातील कामे बंद ठेवली होती. या होळीच्या सणानिमित्त गावागावांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा, नाट्याप्रयोग व मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. काही गावांमध्ये शिमगोत्सवानिमित्त विविध प्रकारची वेशभूषा धारण करून सोंग नृत्य करण्याची प्रथा आहे. ही परंपराही जपण्यात आली. बुधवारी रंगपंचमी ग्रामीण भागामध्ये जल्लोषात साजरी करण्यात आली. या रंगपंचमीची तऊणांनी गेल्या पाच सहा दिवसापासूनच तयारी केली होती. ठीक ठिकाणी ढोल ताशांचा गजर सुरू होता. तर काही ठिकाणी डॉल्बीच्या तालावर तऊणाई नृत्य करताना दिसून येत होती. एकमेकांना भेटून रंग लावून शुभेच्छा देण्यात आल्या.









