बालचमूंच्या विविध वेशभूषा : संगीताच्या तालावर शॉवरखाली थिरकली तरुणाई : महिलावर्गाचीही उपस्थिती लक्षणीय

बेळगाव : शहापूर-वडगावसह ग्रामीण भागात रविवारी पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपंचमी दिवशी विकेंड जोडून आल्यामुळे सकाळपासूनच तरुणाईचा उत्साह अमाप होता. डीजेच्या तालावर बेभान होऊन तरुणांसह बालचमूही थिरकत होते. ठिकठिकाणी लावलेल्या शॉवर डान्सलाही उत्तम प्रतिसाद मिळत होता.

संस्थान काळापासून शहापूर-वडगावसह ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी होते. रविवारी सकाळपासूनच गल्लोगल्ली डीजेचा आवाज घुमू लागला. सकाळी 9 नंतर विविध वेशभूषा केलेले, मुखवटे परिधान केलेले तरुण वाहनांवरून फिरत होते. काही युवक मंडळांनी रेनडान्सचे आयोजन केले होते. त्यामध्ये पाण्याच्या वर्षावात डीजेच्या तालावर डान्स सुरू होते. नवी गल्ली, बसवाण गल्ली, दाणे गल्ली, गणेशपूर गल्ली, कोरे गल्ली, खासबाग, रयत गल्ली, भारतनगर, बाजार गल्ली, विष्णू गल्ली, वझे गल्ली, पाटील गल्ली, मंगाईनगर, येळ्ळूर रोड या परिसरात रंगपंचमीचा उत्साह दिसून आला.

विविध वेशभूषांनी वेधले लक्ष

रंगपंचमीवेळी तरुणाईने केलेली वेशभूषा व केशभूषेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भारतनगर येथे काही तरुणांनी गोणपाटापासून तयार केलेली वेशभूषा केली होती. अत्यंत विनोदी पद्धतीने त्यांचे सुरू असलेले नृत्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी गर्दी होत होती. याचबरोबर विविध रंगांची केशभूषा, मुखवटे लावलेले बालचमू सायकलवरून, दुचाकीवरून फिरत होते. तरुणांसोबतच तरुणी व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दुपारपर्यंत रंगपंचमी साजरी झाल्यानंतर शिवारामध्ये पार्ट्यांचे बेत आखले जात होते. वडगाव, शहापूर, अनगोळ शिवारांमध्ये पार्ट्यांसाठी जागा शोधणाऱ्यांची संख्या अधिक होती. साप्ताहिक सुटी त्याचबरोबर आलेल्या रविवारामुळे मांसाहारी दुकानांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.









