लहान मुलांपासून मोठ्यानीही घेतला आनंद ; विविध रंगांबरोबरच नृत्य, संगीताचीही जोड
पणजी ; रंगपंचमी उत्सव काल मंगळवारी संपूर्ण गोव्यात उत्साहाने, पारंपरिक पद्धतीने रंग लावून साजरा करण्यात आला. राजधानी पणजीतील आझाद मैदानावर तर गीतांच्या तालावर नाचत-गाजत रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्यासाठी तेथे मंडप उभारण्यात आला होता. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण तरुण मुले, मुली तसेच महिलांनी त्यात उत्साहाने भाग घेतला. पाटो-पणजी येथील सरकारी वसाहतीतदेखील रंगपंचमीनिमित्त विविध खेळ स्पर्धा घेण्यात आल्या आणि उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.
सर्वांनी मुक्तपणे घेतला आनंद
सार्वजनिक सुटी असल्याने लोकांनी आपापल्या घराशेजारी, वसाहतीत रंगपंचमी खेळण्यास प्राधान्य दिले. बहुतेकांनी नैसर्गिक रंगांचा वापर केला. लहान मुलांनी पिचकाऱ्यांतून एकमेकांवर रंगांचे पाणी उडवून रंगपंचमीचा आनंद लुटला. गेली दोन तीन वर्षे कोरोनामुळे रंगपंचमी मर्यादीत प्रमाणात साजरी झाली होती. परंतु यंदा कोरोनाचे अरिष्ट नसल्यामुळे आणि ते संपुष्टात आल्यामुळे सर्वांनी मुक्तपणे रंगपंचमीचा आनंद घेतला. कळंगूट पोलीस स्थानकातील कर्मचारा,r अधिकारीवर्गाने तेथेच रंगपंचमी साजरी करुन आनंद घेतला. त्यांना घरी जाणे शक्य होत नसल्याने त्यांनी पोलीस स्थानकातच आनंदाने रंगपंचमी केली. लोकांनी आपापली वाहने घेऊन मित्र, नातेवाईकांच्या घरी जाऊन रंगपंचमी साजरी केले. कामगारवर्गाने देखील रंगपंचमीची मजा लुटली.









