बेळगाव : डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत शहापूर-वडगावच्या तरुणाईने बुधवारी रंगपंचमीचा आनंद लुटला. मागील वर्षाच्या तुलनेत उत्साह थोडासा कमी असला तरी पुरुषांसह महिलांनीही रंगपंचमीमध्ये सहभाग घेतला. स्प्रिंक्लरमधून शिडकावा केल्या जाणाऱ्या पाण्यासोबत रंगांचा आनंद सर्वांनी प्रामुख्याने तरुणाई आणि बालचमूंनी घेतला.
शहापूर व वडगाव परिसरात पारंपरिक पद्धतीने होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी झाली. बुधवारी सकाळपासूनच डीजेच्या तालावर बालचमूंचे नृत्य सुरू झाले. खासबाग, भारतनगर, खडेबाजार, कचेरी गल्ली, रयत गल्ली, तेग्गीन गल्ली, नाझर कॅम्प, कारभार गल्ली, पाटील गल्ली या परिसरात डीजे तसेच स्प्रिंक्लर लावण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी येऊन थिरकण्यासाठी तरुणांची धडपड सुरू होती.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी रंगपंचमी खेळणाऱ्यांची संख्या कमी होती. तरी देखील महिलांसह लहानग्यांनीही रंगोत्सवाचा आनंद घेतला. रंग खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी झाली होती. एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा उत्साह द्विगुणित केला. बुधवारी काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने शालेय विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी होती.
संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त
रंगपंचमीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर, वडगाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. विशेषत: शहापूर येथील काकेरू चौकात मोठा पोलीस फौजफाटा होता. या परिसरात अनेक वेळा लहान-सहान कारणांनी गोंधळ निर्माण होत असल्याने पोलिसांनी काळजी घेतली होती. यानुसार ज्या ज्या ठिकाणी डीजे लावले होते, त्या त्या ठिकाणी पोलीस फौजफाटा होता.










