युवावर्ग डॉल्बीच्या तालावर नाचत लुटला रंगोत्सवाचा आनंद : बालचमूंचा सहभाग मोठा
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्मयातील काही गावात बुधवारी रंगपंचमी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासूनच बालचमूनी रंग खेळण्यास सुरुवात केली होती. गल्लोगल्ली लहान मुले फिरत रंग खेळत होते. सकाळी नऊनंतर तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटण्यास सुरुवात केली. खानापूर शहरात स्टेशन रोडवरील लक्ष्मी मंदिर, केंचापूर गल्ली, निंगापूर गल्ली, रवळनाथ मंदिर, कडोलकर गल्ली, बसवेश्वर मंदिर परिसरात युवावर्गाने डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत होती. पाण्याच्या फवारणीसह कारंज्या करण्यात आले होते.
लक्ष्मी मंदिरासह शहरातील निंगापूर गल्ली, केंचापूर गल्ली, रवळनाथ मंदिर चौक तसेच शहरातील विविध भागात डॉल्बीच्या गाण्यावर तऊणाई नाचण्यात दंग झाली होती. लहान मुलानी वेगवेगळे मुखवटे परिधान करून रंगपंचमीचा आनंद लुटत होते. तर तरुणानी वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा करून स्प्रिंकलरच्या फवारणीवर डॉल्बीच्या तालावर बेभान होऊन नाचत होते. रंगपंचमीत कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी व त्यांचे सहकारी विशेष लक्ष ठेवून होते. दुपारी 1 पर्यंत रंगपंचमी खेळण्यात आली. या शिवाय जांबोटी क्रॉस, हलकर्णी, गांधीनगर या ठिकाणी देखील रंगपंचमीचा अमाप उत्साह दिसून येत होता. गल्लोगल्ली आपल्या परिसरात मुली व महिलांनीदेखील रंगपंचमीचा आनंद लुटला. खानापूर शहरासह तालुक्याच्या काही ग्रामीण भागातही शनिवारी रंगपंचमी उत्साहात साजरी झाली.
आज चव्हाटा देवाची यात्रा
शहरात परंपरेप्रमाणे निंगापूर गल्ली येथील चव्हाटा देवाची यात्रा रंगपंचमीच्या दुसरे दिवशी होते. त्याप्रमाणे आज गुरुवारी दुपारी 3 वाजता चव्हाटा देवाचा मुख्य गाऱ्हाणा होऊन यात्रेला सुरुवात होणार आहे. रात्री 11 वाजता गाऱ्हाणा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.









