मिरज :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने येथील माजी महापौर संगीता खोत यांच्या संकल्पनेतून रेखाटलेल्या भव्य रांगोळीने विश्वविक्रमी नोंद केली आहे. प्रसिद्ध रांगोळीकार आदमआली मुजावर यांनी ६० बाय ८० फूट आकारात अहिल्यादेवींची अश्वारूढ रांगोळी रेखाटली होती. या रांगोळीने लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि युएसए बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान पटकाविले आहे. या रांगोळीमुळे जगभरातील २७ गिनीज रेकॉर्डमध्ये आदमआली मुजावर यांचे नाव कोरले गेले आहे. अश्वारूढ अहिल्यादेवींची प्रतिमा रांगोळीतून रेखाटन करून त्यांना अभिवादन करण्यासाठी रांगोळीतून विश्वविक्रम केला होता. ६० बाय ८० फुटाची अहिल्यादेवींची प्रतिमा रेखाटन करून विश्वविक्रम करण्यात आला. ही रांगोळी रेखाटन करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला. चार टन रांगोळी, दोनशे किलो रंग, दोनशे किलो पेपर व १५० पेक्षा अधिक रंगछटा वापरून प्रतिमा रेखाटण्यात आली होती.
यासाठी स्पेशल नायनॉल रांगोळीचा वापर करून पिगमेंट, फ्लोरेसेंट, पावडर, लेग कलर स्पेशल रंगांचा वापर केला होता. अहिल्यादेवीची प्रतिमा उत्कृष्टपणे साकारली होती. चेहऱ्यावरील सात्विक भाव अतिशय बोलका चेहरा त्यांना करारी स्वभाव, चेहरा दहा फुटाना असून हातामध्ये भाला, कमरेला तलवार, पांढऱ्या साडीतील अश्वारूढ प्रतिमा साकारली होती. ५० तासांमध्ये ही रांगोळी पूर्ण केली.

या रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आमदार इद्रिस नाईकवाडी, सत्यजित देशमुख, संगीता खोत, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, नीताताई केळकर, स्वाती शिंदे, प्रकाश ढंग यांच्यासह मान्यवरांनी आदमअली मुजावर यांचे कौतुक करून सदरची रांगोळी विश्वविक्रम करेल असा विश्वास व्यक्त केला होता. रांगोळी पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम अहिल्यामकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
या रांगोळीची आता जागतिक बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे. लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि युएसए बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अहिल्यादेवींची विश्वविक्रमी रांगोळी नोंद झाली आहे. रांगोळीकार आदमआली मुजावर व त्यांचे सहकारी सत्तू कुडचे, दत्ता माघाडे, अभिजीत सुतार, जाफर मुजावर, साकेत थोरात, निलोफर इनामदार जागतिक रेकॉर्डमध्ये आपले स्थान मिळवले आहे.
रांगोळी मुजावर यांनी आत्तापर्यंत २५ वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये विक्रम मिळवला होता. आता आणखी दोन विक्रम त्यांच्या नावावर झाले आहेत. २०१७ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार मिळाला आहे. चित्रकला व रांगोळीची शिबिरे मार्गदर्शन व व्याख्याने मोफत घेऊन त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत.








