आ. वैभव नाईक यांचा राणेंना टोला
कणकवली / प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे खड्डेमय झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र रविंद्र चव्हाण यांच्यावर नारायण राणेंना विश्वास नसल्याने राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीसाठी निवेदन देऊन मागणी केली असा टोला आमदार वैभव नाईक यांनी राणेंना लगावला आहे.
गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई गोवा महामार्गाची अवस्था दयनीय बनली आहे.गणेश चतुर्थीच्या अगोदर हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास धोकादायक बनणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण करून घेण्यात आले. हा महामार्ग केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे उर्वरित महामार्गाची दुरुस्ती करण्यास असमर्थ ठरले आहेत.









