वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी नेमबाज तसेच कुशल क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांची आशिया ऑलिम्पिक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आशिया ऑलिम्पिक मंडळाचे (ओसीए) अध्यक्षपद भूषविणारे रणधीर सिंग हे पहिले भारतीय नागरिक आहेत.
रविवारी येथे झालेल्या 44 व्या ओसीएच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये 77 वर्षीय रणधीर सिंग यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. रणधीर सिंग हे पंजाबमधील पतियाळाचे रहिवासी असून त्यांचा जन्म क्रीडापटूंच्या कुटुंबामध्ये झाला आहे. रणधीर सिंग यांचे काका यदविंद्र सिंग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच ते आयओसीचे सदस्यही होते. रणधीर सिंग यांचे वडील भालिंद्र सिंग हे 1947 ते 1992 या कालावधीत आयओसीचे सदस्य होते. तसेच त्यांनी या कालावधीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती.









