लवकरच सुरू होणार चित्रिकरण
बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाच्या बळावर ओळख निर्माण करणाऱया अभिनेत्यांच्या यादीत रणदीप हुड्डाचे नाव देखील सामील आहे. रणदीप स्वतःच्या अभिनयाची जादू पुन्हा दाखवून देण्यासाठी मोठय़ा पडद्यावर परतणार आहे. दीर्घकाळापासून मोठय़ा पडद्यावरून दूर राहिलेल्या रणदीपने स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

रणदीपने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘लाल रंग’चा सीक्वेल असणार आहे. लाल रंग 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन सैयद अहमद करत असून यात रणदीप पुन्हा एकदा शंकरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. रणदीपने ‘लाल रंग 2’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत दिलेली कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्याने ‘ये लो!! हवा मै प्रणाम’ असे नमूद केले आहे.
रणदीप हुड्डानुसार लवकरच या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे. लाल रंग या चित्रपटात हरियाणाच्या रक्तपेढीतील चोरीची कहाणी दर्शविण्यात आली होती. याच्या सीक्वेलमध्ये कुठली कहाणी दर्शविण्यात येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रणदीप हुड्डा याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. अलिकडेच तो एका वेबसीरिजमध्ये दिसून आला होता. यातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.









