ऑनलाईन टीम / मुंबई :
राजद्रोहाचा गुन्हा दाखल असलेले अमरावतीचे राणा दाम्पत्य (Rana couple) 29 एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र, जामीन अर्जावरील निकालाचे लिखाण पूर्ण न होऊ शकल्याने आणि उद्या ईदची सुट्टी असल्याने राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामिनावर बुधवारी (दि.04) सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट तसेच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर देशद्रोहासह अन्य कलामांन्वये गुन्हे दाखल आहेत. राणा दाम्पत्य 29 एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात सादर केली होती. मात्र, मागील रविवारी ही याचिका फेटाळून लावत न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने निकालाचे लिखाण पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात या जमीन अर्जावर सुनावणी होणार आहे.