वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गाजियाबादच्या विशेष न्यायालयाकडून बजावण्यात आलेल्या समन्सला आव्हान देणारी पत्रकार राणा अय्यूब यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली आहे. न्यायाधीश व्ही. रामासुब्रमण्यन आणि जे.बी. पारधीवाला यांच्या खंडपीठाने अय्यूब यांना संबंधित न्यायालयासमोर न्यायाधिकारचा मुद्दा उपस्थित करण्याची अनुमती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी रोजी समन्सला आव्हान देणाऱया अय्यूब यांच्या याचिकेवर स्वतःचा निर्णय राखून ठेवला होता. ईडीने मागील वर्षी 12 ऑक्टोबर रोजी अय्यूब यांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले होते. देणगीच्या नावाखाली प्राप्त 2.69 कोटी रुपयांची रक्कम खासगी संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.









