आयटी कायद्यांतर्गत ट्विटरकडून कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ट्विटरने पत्रकार राणा अयूब यांच्या अकौंटवर भारतात बंदी घातली आहे. या कारवाईबद्दल अयूब यांनी ट्विटरला सवाल केला आहे. अखेर हे काय आहे अशी विचारणा त्यांनी नोटीस पोस्ट करत केली आहे. अयूब यांच्या अकौंटवर माहिती-तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या स्थानिक कायद्यांच्या अंतर्गत जबाबदारींचे पालन करत भारतात या अकौंटवर बंदी घालण्यात आली असल्याचे ट्विटरने नोटीसमध्ये नमूद केले आहे.
आमच्या सेवेचा वापर करणाऱया लोकांच्या आवाजाचा बचाव करणे आणि त्याचा सन्मान करण्यावर ट्विटरचा दृढ विश्वास आहे. एखाद्या अधिकृत संस्थेकडून (कायदा अंमलबजावणी किंवा शासकीय यंत्रणा) मजकूर हटविण्यासाठी कायदेशीर विनंती मिळाल्यास अकौंट धारकाला याची माहिती देणे हे आमचे धोरण आहे. वापरकर्ता संबंधित देशात राहतो की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही नोटीस बजावत असल्याचे ट्विटरकडून म्हटले गेले आहे.
टेनिसपटू मार्टिना नवरातोलिना यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘तर पुढील कारवाई कोणावर? हे भयानक आहे…!’ असे म्हणत मार्टिना यांना या पोस्टमध्ये राणा अयूब आणि ट्विटरला टॅग केले आहे.
ट्विटरची नोटीस म्हणजे मागील घटनांवरून उशिरा उमटलेली प्रतिक्रिया असू शकते. मागील वर्षी ट्विटरकडून मलाही अशाप्रकारचा ईमेल मिळाला होता असा दावा प्रसारभारतीचे माजी सीईओ शशि शेखर वेम्पति यांनी केला आहे.
अयूबवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप
अंमलबजावणी संचालनालयाने चालू वर्षी राणा अयूब यांची 1.77 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. अयूब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. तसेच मदतकार्यांसाठी जमा केलेल्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राणा अयूब यांनी मात्र स्वतःवरील सर्व आरोप नाकारले आहेत.









