दर्शनासाठी रामभक्तांची अलोट गर्दी : पूजा-पाळणागीत : भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन
वार्ताहर /किणये
तालुक्यात बुधवारी रामनवमी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध मंदिरांमध्ये पहाटे काकडारती, यानंतर प्रभू श्रीराम मूर्तीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. दुपारी 12 च्या दरम्यान ठिकठिकाणी रामजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी सर्वत्र जय श्रीराम असा जयघोष झाला होता. यामुळे अनेक गावातील मंदिरे राममय बनली होती. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील प्रभू श्री राममंदिराचे उद्घाटन झाल्यामुळे यंदाचा रामनवमी सोहळा भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. तालुक्याच्या विविध गावांमध्ये प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महिलांनी पाळणागीत म्हटले. त्यानंतर पुष्पवृष्टी करून रामजन्म सोहळा साजरा केला. काही ठिकाणी तीर्थप्रसादाचे वाटप तर काही ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला होता. मंदिरामध्ये भजन, प्रवचन व कीर्तन असे कार्यक्रम झाले. पिरनवाडी येथील रामलिंग गल्लीतील राममंदिरात रामनवमी सोहळा उत्साहात साजरा केला. मंगळवारपासून या मंदिरात या सोहळ्याला सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभर भजन व इतर कार्यक्रम झाले. रात्री पंढरपूर येथील हभप गौराताई सांगळे यांचे कीर्तन झाले.
श्रीरामाची विशेष पूजा
बुधवारी सकाळी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीला अभिषेक करून राम, लक्ष्मण, सीता व हनुमान मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली. दुपारी 12 वा. रामजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पिरनवाडी परिसरात प्रभू श्रीरामाचे एकमेव मंदिर असल्यामुळे याठिकाणी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रमोद मुचंडीकर, मारुती उसुलकर, विक्रम खमकार, राजू लाड, विनायक मुचंडीकर, सतीश राऊत, आदींनी भाविकांचे स्वागत केले. यावेळी पिराजी शिंदे, पिराजी राऊत, लक्ष्मण मुचंडीकर, रविंद्र मुचंडीकर, पिराजी खमकार, चंद्रकांत गुंडोजी, बबन नेसरकर, प्रकाश बडकुंद्री, आदींसह गल्लीतील कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
मच्छे हनुमान मंदिरात रामनवमी
मच्छे येथील मारुती गल्लीतील हनुमान मंदिरात रामनवमी साजरी करण्यात आली. सकाळी पूजा, दुपारी रामजन्मोत्सव सोहळा साजरा केला. रात्री हरे रामा हरे कृष्णा व गल्लीतील वारकऱ्यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरासमोर रामनवमी साजरी करण्यात आली. राम प्रतिमेचे पूजन करून गावातील मुलींनी पाळणागीत म्हटले. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
नंदिहळ्ळी येथे श्रीराम नवमी उत्साहात
नंदिहळ्ळी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्रीराम नवमी उत्साहाने साजरी करण्यात आली. बुधवार दि. 17 रोजी येथील मंदिरात पहाटे काकड आरती व सकाळी 7 ते 8 मूर्ती पूजन आणि अभिषेक, त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत भजन करण्यात येऊन 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव व पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर श्रीराम मूर्तीची टाळमृदंगाच्या गजरात गावभर दिंडी काढण्यात आली. सर्व कार्यक्रमात येथील पारायण मंडळाचे अध्यक्ष सुरेश जाधव, कल्लाप्पा जाधव, यशवंत कामाणाचे, सिद्राय जाधव, गंगाराम पप्पूचे आदी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
धामणे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रामनवमी
धामणे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम नवमी टाळमृदंगाच्या गजरात भक्तिभावाने साजरी करण्यात आली. बुधवार दि. 17 रोजी सकाळी मंदिरातील देवाच्या मूर्तीला हभप मारुती सांबरेकर महाराजांच्या सानिध्यात अभिषेक घालून विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत भजन कार्यक्रम करण्यात आला. 12 वाजता श्रीराम नवमी उत्सव श्रीरामाचे स्तोत्र पठण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर धामणे ग्रा. पं. अध्यक्ष पंडित पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थान पंचकमिटीचे सदस्य श्रीकांत डुकरे, महादेव चौगुले, हभप मोनाप्पा होनुले, हभप सुरेश बाळेकुंद्री येथील पारायण मंडळाचे सर्व सदस्य व गावातील भक्त, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देसूर येथे श्रीराम नवमी साजरी
देसूर येथील श्रीराम मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीनिमित्त मंगळवार दि. 16 रोजी श्रीराम मंदिरात पूजन व आरती झाल्यानंतर श्रीराम देवाच्या पादुकांची सवाद्य टाळमृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक पार पडली. बुधवार दि. 17 रोजी श्रीराम मंदिरात पहाटे काकड आरती आणि भजन कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 12 वा. श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर भजन कार्यक्रम होऊन रात्री मंदिरासमोर कारलगा ता. खानापूर येथील भारुड भजनाचा कार्यक्रम पार पडला. गुरुवार दि. 18 रोजी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम होऊन दुपारी 1 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.









