पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दुपारी 12.30 वाजता अभिषेक सोहळा होणार असून पंतप्रधान मोदी त्यात सहभागी होणार आहेत. रामजन्मभूमी निर्माण समितीच्या सदस्यांनी बुधवारी पंतप्रधानांची भेट घेत या सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी मंदिराच्या निर्मितीकार्यासह अन्य मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य श्री राम मंदिरात 22 जानेवारीला अभिषेक कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता अभिषेक सोहळा होणार आहे. रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सदस्यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेत त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असून पंतप्रधानांनी ते स्वीकारले. सदर भेटीचे छायाचित्र ‘एक्स’ वर पोस्ट करत त्यासंबंधीची माहितीही पंतप्रधानांनी ट्विट केली. ‘आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. नुकतेच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी मला श्री राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. जय सियाराम.’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
अलीकडेच अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा उल्लेख करताना शतकांची प्रतीक्षा संपत आहे. राम मंदिर बांधणे हा आपला विजय आहे. प्रभू राम येणार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले होते. तर काही काळापूर्वी राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विधी होणार असल्याचे सांगितले होते. आमच्या वतीने पीएमओला पत्र लिहिण्यात आले असून त्याचे उत्तरही मिळाले आहे. आता 22 जानेवारीला पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार, प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीलाच होणार हे निश्चित झाले आहे. या कार्यक्रमासाठी आणखी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 2019 च्या निर्णयात अयोध्येतील वादग्रस्त जागेवर ट्रस्टद्वारे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला होता. याशिवाय, नवीन मशिदीच्या बांधकामासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. 16व्या शतकातील बाबरी मशीद ज्या वादग्रस्त जागेवर उभी होती ती 2.77 एकर जागा केंद्र सरकारकडे राहील आणि निकालानंतर तीन महिन्यांच्या आत मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येईल, असा निकाल न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आता अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.









