वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच यावेळी भारतीय संघाला पाक संघाविरुद्ध पाकच्या भूमीवर लढत द्यावी लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही डेव्हिस लढत ग्रासकोर्टवर खेळविली जाणार आहे. तब्बल 60 वर्षांनंतर भारतीय संघ पाकमध्ये खेळणार आहे. सदर लढत 3-4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. डेव्हिस चषक स्पर्धेतील विश्व गट एक प्ले ऑफ लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संघाचे नेतृत्व रोहित राजपालकडे राहिल.
या लढतीसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय डेव्हिस संघामध्ये रामकुमार रामनाथनचा समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय टेनिस फेडरेशनने या लढतीसाठी पाच सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला आहे. रामकुमार रामनाथन, एन. श्रीराम बालाजी, युकी भांब्री, निकी पुणाच्या आणि साकेत मिनेनी यांचा समावेश आहे.









