वृत्तसंस्था/ बेंगळूर
एटीपी टूरवरील येथे झालेल्या पुरूषांच्या बेंगळूर खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथम आणि साकेत मिनेनी यांनी पुरूष दुहेरीचे जेतेपद पटकाविले. मात्र पुरूष एकेरीत भारताच्या सुमित नागलचे आव्हान उपांत्यफेरीत समाप्त झाले.
इटलीच्या स्टिफॅनो नेपोलीटेनोने द्वितीय मानांकीत सुमित नागलचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा सामना सव्वादोन तास चालला होता. तसेच एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण कोरियाच्या हाँगने स्पेनच्या बॅटेलाचा 6-2, 3-6, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. नेपोलीटेनो आणि हाँग यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या रामकुमार रामनाथन आणि साकेत मिनेनी यांनी फ्रान्सच्या जेनव्हीर आणि कोझुमिन यांचा 6-3, 6-4 अशा फडशा पाडत जेतेपद पटकाविले. अलिकडच्या कालावधीतील रामकुमार रामनाथन आणि साकेत मिनेनी यांचे हे दुसरे अजिंक्यपद आहे. गेल्या आठवड्यात चेन्नईमध्ये झालेल्या स्पर्धेत रामकुमार आणि साकेत यांनी दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते.
नागलचा गौरव
उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू होण्यापूर्वी कर्नाटक लॉन टेनिस संघटनेतर्फे सुमित नागलला रोख रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. एटीपीच्या ताज्या मानांकन यादित सुमित नागलने पहिल्या 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळविल्याने त्याला 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.









