एस. जी. शिंदे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
खानापूर : शिवाजीनगर येथील मराठी प्राथमिक शाळा इमारतीच्या दुरुस्तीकडे तसेच स्वयंपाक खोली आणि स्वच्छता गृहांची डागडुजी करण्यात यावी तसेच नव्याने स्वयंपाक खोली उभारण्यात यावी, शाळेच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी रामगुरवाडी ग्रा. पं. कडे वेळोवेळी करण्यात आली. मात्र जाणीवपूर्वक ग्रा. पं. चे पीडीओ यांनी दुर्लक्ष केले आहे. असा आरोप शिवाजीनगर येथील शिक्षण प्रेमी आणि समाजसेवक एस. जी. शिंदे यांनी शिवस्मारक येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत 25 पटसंख्या आहे. ही शाळा टिकवण्यासाठी शिवाजीनगर परिसरातील नागरिकांचे मोठे योगदान आहे. सुरवातीला आठ पटसंख्या असताना शासन ही शाळा बंद करण्यासाठी प्रयत्नात होते. मात्र नागरिकांच्या प्रयत्नामुळे शाळेची पटसंख्या वाढलेली आहे.
मात्र शाळा इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने वर्गखोल्यांना गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना पाण्यात बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच प्रश्न निर्माण झाला आहे. स्वयंपाक खोली पूर्णपणे निकामी झाली असल्याने बांधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह उभारणे गरजेचे आहे. या सर्व बाबी शाळा सुधारणा कमिटीच्या निदर्शनास आल्यानंतर शाळा सुधारणा कमिटीने रामगुरवाडी ग्रा. पं. ला शाळेचा विकास करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. वेळोवेळी निवेदन देवूनसुद्धा पीडीओंनी या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तालुक्यातील इतर शाळांच्या विकासासाठी ग्रा. पं. कडून लाखोचा रु. चा निधी मंजूर केला आहे. त्याच्यातून शाळांचा विकास झाला आहे. मात्र रामगुरवाडी पीडीआंsंच्या दुर्लक्षामुळे शाळेचा विकास खुंटला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांनी या शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.









