आपली वाट देवचाराने दाखवलेलीच : गोविंद गावडे यांनी पुन्हा डागली तोफ
पणजी : माजी मंत्री गोविंद गावडे आणि विद्यमान मंत्री रमेश तवडकर यांच्या दरम्यानचा वाद संपुष्टात आला, असे निवेदन प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी करून 24 तास उलटतात, तोच गोविंद गावडे यांनी मंत्री तवडकर यांच्यावर प्रचंड टीका करून आपल्याला संपवण्यासाठी तवडकर यांनी सुपारी घेतली, असा गंभीर आरोप केला. खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत गोविंद गावडे यांनी रमेश तवडकर यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. तवडकर हे हात धुवून आपल्यापाठी लागले आहेत. पर्रीकरांनी ज्यांना भस्मासुर म्हटले होते त्या भस्मासुरांना हाती धरून आपल्याला संपविण्याची सुपारी तवडकर यांनी घेतली.
तवडकर हे क्रीडामंत्री होते. त्यांनी आपल्या खात्यात खूप मोठी बिले तयार करून ठेवली आणि आपण जेव्हा क्रीडामंत्री झालो त्यावेळी ती बिले आपण फेडत गेलो, असेही गोविंद गावडे म्हणाले. आपण देवचाराने दाखविलेल्या वाटेवरून जात आहे, मात्र तवडकर यांची वाट चुकीची आहे. श्रमदाम ही त्यांनी केलेली योजना समाजाच्या भल्यासाठी नसून त्याला राजकीय गंध येत आहे. ही व्यक्ती मास्तर आहे आणि त्याला शेणाच्या थाप्याचे महत्त्व माहीत नाही. शेणाचा थापा हा पवित्र आहे हे देखील मास्तराला माहीत नाही, अशा पद्धतीची जोरदार टीका त्यांनी आपल्या मुलाखतीतून केली. गावडे यांच्या टीकेनंतर आता भाजपच्या या दोन्ही नेत्यांमधून वाद आणखीन उफाळून येण्याची शक्यता वाढली आहे. मात्र आपण पर्यायी व्यवस्था केलेली आहे अशा शब्दात गोविंद गावडे यांनी थोडक्यात स्वतंत्र चूल आगामी निवडणुकीत मांडण्याचे संकेत दिले.









