वृत्तसंस्था/ हैदराबाद
रविवारी येथे झालेल्या हैदराबाद हाफ मॅरेथॉनमध्ये तेलंगणाचा धावपटू बी. रमेश चंद्राने तर महाराष्ट्राच्या प्राजक्ता गोडबोले यानी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या गटातील अजिंक्यपद पटकाविले.
रविवारी सकाळच्या गुलाबी थंडीच्या वातावरणात झालेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये तेलंगणाच्या रमेश चंद्राने 21.1 कि.मी.चे अंतर 1 तास, 13 मिनिटे आणि 10 सेकंदाचा अवधी घेत पूर्ण करत प्रथम स्थान मिळविले. सतीश कुमारने 1 तास 15 मि. आणि 50 सेकंदाचा अवधी घेत दुसरा क्रमांक तर पियुष मसानेने 1 तास 16 मि. 56 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात महाराष्ट्राच्या 28 वर्षीय प्राजक्ता गोडबोलेने 1 तास 23 मि. आणि 45 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान तर प्रेणू यादवने 1 तास 24 मि. 46 सेकंदाचा अवधी घेत दुसरे तसेच तेजस्वीनी युंबकेनीने 1 तास 25 मि.आणि 11 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले. हैदराबाद हाफ मॅरेथॉनचे उद्घाटन भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्याहस्ते करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 8 हजार धावपटूनी विविध गटात आपला सहभाग दर्शविला होता. 10 कि.मी. पल्ल्याच्या मॅरेथॉनमध्ये चेतन कुमारने 34 मि. 21 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान तर भरतसिंगने दुसरे स्थान पटकाविले. महिलांच्या विभागात शिलु यादवने पहिले तर मुस्कानने दुसरे स्थान मिळविले.









