वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा माजी फिरकी गोलंदाज तसेच भारतीय महिला संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रमेश पोवार यांची गुजरात वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी क्रिकेट हंगामाकरीता प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सदर माहिती गुजरात क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.
गुजरात क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज पार्थिव पटेल याचा समावेश असून त्याने रमेश पोवराला प्रमुख प्रशिक्षक पदासाठी आपली पसंती दर्शविली होती. रमेश पोवार क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक क्षेत्रात बऱ्यापैकी आपला जम बसविला होता. भारताच्या राष्ट्रीय महिला संघाचे ते दोनवेळा प्रमुख प्रशिक्षक होते. अलिकडेच रमेश पोवार यांची बेंगळूरमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने नियुक्ती केली होती. गेल्या वर्षीच्या क्रिकेट हंगामात गुजरात संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद मुकुंद परमार यांनी भूषविले होते.









