वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अॅथलेटिक्समध्ये डोपिंगच्या अनेक प्रकरणांनी धुमाकूळ घातला असून कनिष्ठ राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश नागपुरी यांना ‘नाडा’ने डोपिंगमध्ये सहभागी असल्याबद्दल निलंबित केले आहे, तर सात खेळाडूंवरही चाचण्या चुकवल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. आणखी दोन प्रशिक्षक करमवीर सिंग आणि राकेश यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय डोपिंगविरोधी यंत्रणेने (नाडा) डोपिंग प्रकरणात प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीत चाचण्या चुकवल्याठाद्दल निलंबित करण्यात आलेल्या सात खेळाडूंमध्ये पारस सिंघल, पूजा राणी, नलूबोथू षण्मुग श्रीनिवास, चेलिमी प्रतुषा, शुभम महारा, किरण आणि ज्योती यांचा समावेश आहे. 19 वर्षीय सिंघलने 2024 मधील खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये हरियाणातर्फे 2000 मीटर स्टीपलचेसची मुलांची शर्यत जिंकली होता, तर 2024 मध्ये श्रीनिवासने फेडरेशन कप, राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि नॅशल ओपनमध्ये 200 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.
हैदराबादमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात कार्यरत असलेले आणि 2023 मध्ये ‘अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया’द्वारे (एएफआय) कनिष्ठ मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले नागपुरी हे एक प्रसिद्ध व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक आहेत. त्यांना 2021 च्या नाडा अँटी-डोपिंग नियमांच्या कलम 2.9 च्या अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरी यांनी दोन खेळाडूंना एसएआय हैदराबाद केंद्रात ‘नाडा’ने पाठवलेल्या डोप कलेक्शन अधिकाऱ्यांकडून घेतली जाणारी चाचणी टाळण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
नागपुरी यांनी अव्वल धावपटू आणि महिला विभागातील 100 मीटर राष्ट्रीय विक्रमधारक दुती चंद तसेच 2024 पॅरालिम्पिकमधील कांस्यपदक विजेती आणि विद्यमान विश्वविजेती (400 मीटर टी20 वर्ग) दीप्ती जीवनजी यांना प्रशिक्षण दिलेले आहे. नागपुरी यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. ‘मी यावर भाष्य करू इच्छित नाही. मी माझ्या क्षमतेनुसार भारतीय अॅथलेटिक्सची सेवा करत आहे’, असे ते म्हणाले. एएफआय अधिकाऱ्यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.









