वृत्तसंस्था/ चेन्नई
आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या रमेश बुधिहाळने पुरुषांच्या विभागात कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात भारताला पदक मिळवून देणारा रमेश बुधिहाळ हा पहिला स्पर्धक आहे.
पुरुषांच्या खुल्या गटातील सर्फिंग प्रकारात रमेशने 12.60 गुण नोंदवित तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात कोरियाच्या कॅनोआ हिजेने 15.17 गुण घेत सुवर्ण तर इंडोनेशियाच्या पेजर अरियानाने 14.57 गुण घेत रौप्यपदक पटकाविले.
महिलांच्या खुल्या गटामध्ये जपानच्या अनेरी मात्सूनोने 14.90 गुणासह सुवर्ण, जपानच्या सुमोमो सॅटोने 13.70 गुणांसह रौप्य आणि थायलंडच्या इसाबेल हिग्जने 11.76 गुणासह कांस्य पदक मिळविले. मुलांच्या 18 वर्षाखालील वयोगटात कोरियाच्या हिजेने 14.33 गुणांसह सुवर्ण तर चीनच्या वूने 13.10 गुणासह रौप्य आणि चीनच्या जीयांगने कास्यपदक घेतले. मुलींच्या 18 वर्षाखालील गटात चीनच्या सिक्वी यांगने 14.50 गुणांसह सुवर्ण तर चीनच्या जीनने 10.33 गुणासह रौप्य आणि थायलंडच्या ईसाबेलने 8.10 गुणासह कांस्यपदक मिळविले.
…









