ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मुंबई- शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच व्यक्त झाले. उद्धव ठाकरेंच्या भोळेपणाचा फायदा घेत पवारांनी डाव साधला. त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. असा आरोप करत राष्ट्रवादीची हाकालपट्टी करा असे आवाहन कदम यांनी आज केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ५२ वर्षे पक्षासाठी झटतोय. आमच्यामुळे तुम्ही त्या खुर्चीवर बसला आहात. तुम्ही आमची हाकालपट्टी केला हे वाईट वाटतंय , असे म्हणत रामदास यांना अश्रू अनावर झाले.
१९७० पासून मी शिवसेनेत काम करतोय. ५२ वर्ष मी सेनेचा सैनिक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक साक्षीदार आहे. माझ्या स्वप्नात देखील वाटलं नव्हतं कि मी राजीनामा देईन. माझ्या उतरत्या वयात माझं शिवसेनेचे हे हाल होईल वाटलं नव्हतं. शिवसेनेचे अस्तित्व आम्ही उभं केलंय. पक्षातील आमचं अस्तित्व अंधकारमय होईल असे वाटलं नव्हतं. हे आम्हाला पाहवत नाही. जे काही सुरु आहे त्यामुळे आम्हाला झोप लागत नाही. मी राजीनामा देतोय याचा अर्थ मी खुश आहे असा नाही. त्याचा आनंद मला वाटत नाही. असे रामदास कदम म्हणाले.
आम्ही अंगावर गुन्हे घेऊन हि शिवसेना मोठी केली आहे. पण आमच्यावर राजीनामा देण्याची वेळ का यावी याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी विचार केला पाहिजे. ५२ वर्षे काम करणारा नेता राजीनामा का देतोय विचारायला हवे होते. आमची हाकालपट्टी करताय, आमच्या मेहनतीने तुम्ही त्या खुर्चीवर बसला आहात. आम्ही सगळे उभा केले आहे. आमची हाकालपट्टी करताना दुःख आणि वेदना होते. आम्ही हाथ जोडून सांगितले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ नका. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या विरोधात लढून शिवसेना वाढवली. मात्र त्यांच्या मुलाने त्यांच्याशी युती केली. तेंव्हापासून मी मातोश्रीची पायरी चढलो नाही. बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष राहिलेला नाही. शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव साधला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा घेतला. पवारांचा डाव उद्धवजींना कळला नाही. त्यांनी शिवसेना (Shivsena)पक्ष फोडला आहे असा आरोप रामदास कदम यांनी केला.
वेळेवर डाव ओळखले असते तर आज आमच्यावर हि वेळ आली नसती. तुमच्याबाजूला हे शिवसैनिक आहेत का शोधा. शिंदे गटाची तयारी होती. पण एका नेत्याच्या तोंडामुळे ते परत आले नाही. उद्धव ठाकरेंना एकटे पडू देणार नाही. त्यांनी शिंदेंना साथ द्यावी. ते एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न करणार. आमची हाकालपट्टी करण्याआधी राष्ट्रवादीची हाकालपट्टी करा, असे रामदास कदम कडाडले.