ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas-Athawale) यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना आरपीआयमध्ये (RPI) येण्याची ऑफर दिली आहे. बाळासाहेब आंबेडकर, तुम्ही माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्त्व घ्या. मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. समाजाच्या हितासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
देवळाली कॅम्प शहरात बुधवारी रामदास आठवलेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे नाव मजबूत करण्यासाठी मी देशभर फिरतो. रिपब्लिकन पक्षाला आपल्याला व्यापक बनवायचे आहे. सगळय़ा जातीच्या लोकांना या पक्षात आणायचे आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्र आणण्याचा चांगला प्रयोग केला. पण लोकसभा, विधानसभेला एकही माणूस निवडून आला नाही. निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असे चार मोठे पक्ष आहेत. मनसेही आहे. बाळासाहेब आंबेडकरांना माझे नम्र निवेदन आहे की, समाजाच्या हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. तुम्ही माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा. नेतृत्व घ्या. मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे.








