हिंदू धर्मात कोणत्याही देवाचं नाव घेताना प्रथम स्त्रीचं नाव घेतलं जातं पण रामायणामध्ये राम म्हटलं की लक्ष्मण हा येतोच. चैत्रशुद्ध एकादशीला लक्ष्मणाचा जन्म झाला. खरंतर राम शांत विचार स्वभावाचा पण लक्ष्मण मात्र शीघ्रकोपी. रामाचा वनवास ऐकल्यावर सारा राजवाडा त्याने डोक्यावर घेतला. लक्ष्मण पुढे मेघनादाला मारणारा ठरतो. लक्ष्मणाला युद्धात अस्त्र लागल्यावर रामाची जी घालमेल ^झाली त्यातच त्याच्या बंधू प्रेमाची साक्ष मिळते. रामाचं रक्षण करतो, रामासाठी अहोरात्र तो जागा राहतो आणि रामाने सांगितलेला प्रत्यक्ष शब्द जपतो. वनवासात प्रत्येक काम निष्ठेने करणारा लक्ष्मण सतत नम्रपणे रामासमोर दास्य भावाने असतो. स्वतः विश्राम न करता सतत सतर्क असणारा लक्ष्मण सीतेला मातेसमान मानत असला तरी तिच्यासमोर कायम खाली मान घालून झुकून मगच तो तिच्याशी बोलतो.
याचे उदाहरण वाल्मिकी रामायणामध्ये फार सुंदर आलंय. सीतेच्या अपहरणानंतर शोध घेताना रामाला सीतेचे काही दागिने मिळाले पण हे रस्त्यात मिळालेले दागिने नक्की सीतेचेच आहेत का याची खात्री राम पटवून घेताना लक्ष्मणाला दाखवायचा. असा हा लक्ष्मण रामाच्या सत्वपरीक्षेच्या वेळेला तत्पर राहून विश्वासाने काम करतो. सीतेच्या अग्निपरीक्षेच्या वेळी कास्ट आणून रचतो. त्यागाच्या वेळेला वाल्मिकींच्या आश्रमात सीतेला सुखरूप पोहोचवतो तर रावण युद्धाच्या वेळेला स्वतः दारावर उभा राहून पहारा देतो. लक्ष्मणाची ही बंधुभावाची पताका उत्तुंग ध्वजदंडासारखी तो सतत पेलतो, हेच लक्ष्मणाचे वेगळेपण. लक्ष्मणाला रामाची पांढरी सावली म्हटले जायचे. तुमची आमची सगळय़ांची सावली काळी पण रामाची पांढरी सावली म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मण, राम भरत, शत्रुघ्न यांच्या जन्मानंतर राजवाडय़ात सर्वत्र आनंद चाललेला असे. चारही मुलांना एकाच पाळण्यात निजवलं जायचं. त्यांची सोयही अर्थातच राजोपचाराने अतिशय वैभव संपन्न अशी होती. परंतु बरेचदा लक्ष्मण रात्री रडत उठायचा. तो इतका कर्कश रडायचा की सगळा राजवाडा गोळा व्हायचा. त्याला शांत करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करायचा. त्यावेळेला अगदीच रडणं थांबलं नाही तर शेवटी राजा वैद्यांना बोलवायच्या ऐवजी भविष्य सांगणाऱयांना बोलवले जायचे. विविध प्रकाराने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जायचा आणि शेवटी त्याला उचलून रामाच्या पायाजवळ ठेवले की हा शांत झोपायचा. इथपासूनच त्याची सेवावृत्ती असण्याची किंवा पायाजवळ असण्याची भावना जोपासली गेली. असा हा लक्ष्मण रामाच्या सावलीसारखा जगला असं म्हटलं तरी चालेल. गुरुगृही बरोबर जाताना राम सतत लक्ष्मणाच्या बरोबर असायचा. लग्नेदेखील या सगळय़ांची एकाच मांडवात झाली. लहानपणापासून एकत्र खेळणारे बाललीला करणारी ही सगळी भावंड एकमेकांना सतत जपताना दिसतात. रामाला राज्याभिषेक ठरल्यानंतर लगेचच दुसरी आज्ञा वनवासाची झाली. दशरथाला विचारायला जावे तर दशरथ दुःखाने बेशूध्द होऊन पडलेला, कौशल्या अतिशय कोलमडून गेलेली आणि कैकयीकडे बोलायचा प्रश्नच नव्हता. अशावेळी सुमित्रेकडे लक्ष्मण आला आणि मनातलं सगळं तिच्याजवळ बोलू लागला की हे काही योग्य झालं नाही. आता मी काय करू. कारण रामाशिवाय मी जगू शकणार नाही. ज्यार्थी राम आणि सीता वनात निघालेत त्याअर्थी तुझंही काम त्या वनातच असणार आहे, अयोध्येमध्ये तुझी इथे जरूरी नाही……हे सांगणारी आई आणि हे आचरणात आणणारा लक्ष्मण म्हणजे खरोखर उत्तम नात्याचं एक प्रदर्शन आहे. आईने सांगितल्यावर त्याने ताबडतोब वनवासाची तयारी केली. आपल्या धर्मपत्नीला उर्मिलाला न भेटताच लक्ष्मण रामाबरोबर निघालासुद्धा. आता दशरथाच्या मृत्यूनंतर भरत, शत्रुघ्न म्हणाले, सर्व क्रियाकर्म पार पडल्यानंतर आता रामाला भेटायला निघूया. त्याच्याबरोबर सर्वजणी निघाल्यानंतर उर्मिलादेखील निघाली. सर्व चित्रकुटावर पोहोचले आणि सीतेच्या लक्षात आलं की लक्ष्मणाने निघतानासुद्धा उर्मिलेशी काहीही बोलणं केलेलं नाही. अशावेळी उर्मिलेला कुटीमध्येच ठेवून सीता बाहेर आली आणि लक्ष्मणाला सांगितलं की देवपूजेसाठी लागणारी फुलं आत नेऊन ठेव. कुटीमध्ये आल्यानंतर पत्नीला समोर पाहून लक्ष्मणाच्या मनाची पुन्हा घालमेल झाली आणि तो अतिशय शांतपणे तिच्यासमोर उभा राहिला. उर्मिलेला मात्र काय बोलावं हेच सुचेना. अशावेळी शेवटी उर्मिलाच बोलू लागली. तिला लक्ष्मणाची रामभक्ती चांगली माहिती होती. बंधूभाव शिकवणारं हे रामचरित मानसातलं कथानक आपण वाचायलाच हवं.








