डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन : रिपब्लिकन पार्टीचा बालेकिल्ला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते विवेक रामास्वामी यांनी ओहियोच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत भाग घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसीतून राजीनामा दिल्याच्या काही आठवड्यांनी रामास्वामी यांनी याची घोषणा केली आहे. ओहियोचा पुढील गव्हर्नर म्हणून स्वत:च्या उमेदवारीची अधिकृत घोषण करताना मला गर्व वाटत आहे. अध्यक्ष ट्रम्प हे अमेरिकेत आमच्या विश्वासला पुन्हा जिवंत करत आहेत. आम्हाला ओहिओत आमच्या विश्वासाला पुनर्जीवित करणाऱ्या नेत्याची गरज असल्याचे उद्गार रामास्वामी यांनी काढले आहेत.
या महान प्रांताचा पुढील गव्हर्नर होण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. ज्या प्रांतात मी जन्मलो आणि वाढलो आणि त्या प्रांतात पत्नीसोबत मिळून मी माझ्या दोन्ही मुलांचे पालनपोषण करत आहे. या प्रांताचे सर्वात चांगले दिवस अजून यायचे आहेत असा दावा रामास्वामी यांनी केला.
रामास्वामीं यांच्यासमोरील आव्हान
रामास्वामी यांच्या एंट्रीमुळे ओहायोच्या गव्हर्नर पदाची शर्यत रंजक ठरली आहे. ओहिओ अॅटर्नी जनरल डेव योस्ट यांनीही गव्हर्नरपदाच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. तर वर्तमान गव्हर्नर माइक डेविन हे पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. ओहियोच्या माजी आरोग्य संचालिका एमी एक्टन यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत.
रामास्वामी यांची आश्वासनं
ओयोत लोकांचा परिवार चांगल्याप्रकारे जीवन जगू शकेल अशाप्रकारचे काम करणार असल्याचे आश्वासन विवेक रामास्वामी यांनी दिले आहे. तसेच मुलांना जागतिक स्तराचे शिक्षण प्रदान करणे आणि व्यवसाय वाढविण्याप्रकरणी देशातील आघाडीचा प्रांत म्हणून ओळख निर्माण करणार आहे. आम्ही या प्रांतात प्रत्येक अनावश्यक विनियमन संपुष्टात आणू. माझ्या प्रशासनाच्या अंतर्गत नवा विनियमन लागू होण्यापूर्वी कमीतकमी 10 अन्य विनियमन रद्द केले जाणार असल्याचे रामास्वामी यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा वरदहस्त
रामस्वामी यांच्या उमेदवारीला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन मिळाले. विवेक रामास्वामी हे ओहियोच्या महान प्रांताच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवत आहेत. मी त्यांना चांगल्याप्रकारे ओळखतो आणि त्यांच्यात काहीतरी खास आहे. ते युवा, मजबूत अन् स्मार्ट आहेत. तसेच एक चांगले व्यक्ती देखील आहेत. विवेक हे ओहियोचे महान गव्हर्नर ठरतील, लोकांची कधीच निराशा करणार नाहीत. त्यांना माझे पूर्ण समर्थन प्राप्त आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.









