अध्याय एकतिसावा
‘रामचरित्र परमपवित्र, कृष्ण चरित्र अतिविचित्र’ असं सर्व प्रवचनकार गंमतीने सांगत असतात. त्यातील कृष्ण चरित्र विचित्र कसं आहे हे त्याच्या चरित्रातील परस्परविरोधी ठळक गोष्टींचे वर्णन मोठ्या खुबीने करून नाथमहाराज सांगत आहेत. श्रीकृष्णाची स्तुती करताना ते म्हणतात, ॐ नमो श्रीसद्गुरुनाथा, अच्युता तू सगुण रुपात असूनसुद्धा देहातीत आहेस.
सगुण रुपात असल्याने त्रिगुण तुझ्यातही आहेत परंतु तू निर्गुणी असल्याप्रमाणे वागतोस. त्यामुळे तुला देहाबद्दल प्रेम, ओढ, आसक्ती नाही. तान्हेपणीच विष प्राशन करून पुतनेचे शोषण केलेस. त्यानंतर दावाग्निचेही प्राशन केलेस. वैकुन्ठ्पिठावर विराजमान असूनसुद्धा तुला देहाभिमान नसल्याने, गवळ्यांच्या मुलात मिसळून त्यांच्याबरोबर क्रीडा केलीस. तुला प्रसन्न करून घेण्यासाठी लोक सोवळेओवळे काटेकोरपणे पाळतात, ते पाळताना होणारा त्रास सहन करतात आणि तू तर कोणतेही सोवळेओवळे न पाळता गवळ्यांच्या पोरांना गोळा करून त्यांच्याबरोबर खाणेपिणे, खेळीमेळीत वागणे ह्या गोष्टी बिनदिक्कत केल्यास. लोक ज्याला दुराचार म्हणतात. तो व्यभिचार करून तू गोपिकांचा उद्धार केलास ही बाब वेद्शास्त्रांना समजण्याच्या पलीकडची आहे. तुझ्या घरी सोळा सहस्त्र नारी तरी तू बालब्रह्मचारी आहेस म्हणून सनतकुमार तुला वंदन करतात. तुझ्या ब्रह्मचर्याची थोरवी एव्हढी अगाध आहे की, जे कडकडीत ब्रह्मचारी म्हणून ओळखले जातात ते शुक आणि नारद तुझ्यासमोर अत्यंत आदराने डोके झुकवतात. एव्हढेच नव्हे तर तुझे नैष्ठिक ब्रह्मचर्य मान्य करून हनुमंत तुझ्या पायावर लोळण घेतो. गोपिकांनी तुझ्यावर अद्भुत प्रेम केल्यामुळे तू त्यांचा उद्धार केलास. वेणू वाजवून गायींचा उद्धार केलास आणि गवळी मंडळींना तुझ्यात सामावून घेतलेस. तसेच दुष्टबुद्धी कंसाचा उद्धार केलास. अपराधी जराव्याधाला स्वर्गात पाठवून दिलेस. असे तुझे जनांच्यावर अगणीत उपकार झाले. तुझ्यात सांगण्याचे उल्लंघन करण्याचे धाडस नसल्याने यमाने तुझ्या गुरूंचा म्हणजे सांदिपनी ऋषींचा मुलगा परत आणून दिला. अशा पद्धतीने श्रीकृष्णाच्या थोरवीचे वर्णन करून झाल्यावर पुढे नाथ महाराज सांगतात, ज्याने कळीकाळालाही अंकित केले आहे त्या श्रीकृष्णाने स्वत:च्या देहाचा त्याग केला. ती अतिगहन कथा शुक मुनी राजा परिक्षिताला सांगत आहेत. आता ह्या कळसाध्यायाच्या कथानकात देव निजधामाला जातील. श्रीकृष्णाचे निजधामगमन हे ब्रह्मादिकांना अतर्क्य असल्याने ते त्याचे वर्णन करू शकले नाहीत पण सद्गुरू जनार्दनस्वामी यांची पूर्ण कृपा असल्याने मी हे व्याख्यान विशद करून सांगेन. मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे दारुकाने द्वारकेला प्रयाण केल्यावर श्रीकृष्णनाथ निजधामाला जायला निघाले. त्यांचा निर्वाणाचा प्रसंग पाहण्यासाठी तसेच त्यावेळचे त्यांचे दर्शन घेण्यासाठी समस्त देवगण स्वत: तिथे हजर झाले. हे निर्वाणकाळीचे वर्णन शुकमुनींच्याकडून ऐकण्यासाठी परीक्षित राजा सावध होऊन बसला. शुकमुनी हे व्यासमुनींचे चिरंजीव असल्याने ते त्यांचा जीव की प्राण होते. तसेच ते योगियांचे चूडारत्नही होते. त्यांनी भागवताच्या एकादश स्कंधात संस्कृतमध्ये देवांच्या निजधामाला जाण्याचे वर्णन केले आहे. ते मी आता मराठीत तुमच्यापुढे मांडत आहे. देवांची विमाने एक एक करून तेथे येऊ लागली. सर्वप्रथम ब्रह्मदेव तेथे आले. नंतर शिव भवानीसहित आले. देवेंद्र त्यांच्या दरबारातील मुख्य मानकऱ्यासह आले. सनकादिक मुनींसारखे मुख्य मुनी तेथे आले. दक्षादि प्रजापती तसेच अर्यमादि पितर, कपिलादि तेथे धावले. गंधर्व विद्याधर, यक्ष, चारण, किन्नर आणि बिभीषणादि थोर राक्षस श्रीधरांच्या महानिर्वाणाच्या प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी तेथे हजर झाले.
क्रमश:








