शहर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उमेदवारी जाहीर : जनमत कौलच्या आधारे निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव दक्षिण मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या जनमत कौलच्या आधारे उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून रमाकांत कोंडुस्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बेळगाव दक्षिणमध्ये समितीचाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून दक्षिण मतदारसंघासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, अॅड. रतन मासेकर, मनोहर किणेकर, मदन बामणे, रवी साळुंखे, वल्लभ गुणाजी, आप्पासाहेब गुरव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारांच्या दक्षिण मतदारसंघातील 87 जणांच्या निवड कमिटीने मुलाखती घेतल्या. मुलाखतीनंतर जनमताची चाचणी घेण्यात आली. प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांना उमेदवारांविषयी काय वाटते? ही माहिती जाणून घेण्यात आली.
शनिवारी सायंकाळी 5 वाजता मराठा मंदिर येथे निवड कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली. खानापूरमधून मुरलीधर पाटील, ग्रामीणमधून आर. एम. चौगुले, बेळगाव उत्तरमधून अॅड. अमर येळ्ळूरकर यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे बेळगाव दक्षिणमधून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.
निवड कमिटीचे अध्यक्ष नेताजी जाधव प्रकृती अस्वस्थामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे अनिल आमरोळे यांना अध्यक्षस्थान देऊन बैठक सुरू करण्यात आली. दक्षिणमधून वल्लभ गुणाजी, मनोहर किणेकर, मदन बामणे, आप्पासाहेब गुरव, रवी साळुंखे, रतन मासेकर यांनी माघार घेतली. त्यामुळे शुभम शेळके व रमाकांत कोंडुस्कर यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. जनमताचा घेण्यात आलेला कौल या आधारे अखेरीला रमाकांत कोंडुस्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सर्व उमेदवारांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
मराठा मंदिरला पोलीस छावणीचे स्वरूप
दक्षिणचा उमेदवार कोण? याबाबत मोठी उत्सुकता असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दंगल प्रतिबंधक दलाचे जवान मराठा मंदिर परिसरात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांची तुफान गर्दी येथे झाली होती. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.









