सामूहिक नमाज पठण : खाद्यपदार्थांची देवघेव
बेळगाव : मुस्लिमांचा पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद सोमवारी बेळगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अंजुमन कॉलेजनजीकच्या ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. यामुळे या परिसरात हजारोंच्या संख्येने बेळगाव शहर व परिसरातील मुस्लीम बांधव उपस्थित होते. श्रद्धा आणि भावनेने मागील महिनाभर रोजे (उपवास) पाळल्यानंतर सोमवारी रमजान साजरा झाला. उपवास सोडले जाणार असल्याने गोड तसेच चमचमीत खाद्य पदार्थांची मुस्लिमांच्या घरी रेलचेल होती. दूध, दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ, सुकामेवा तसेच शिरकुर्मा घरोघरी बनवण्यात आला होता. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत रमजान ईद साजरी झाली.
रोजे सुरू असल्याने बेळगावच्या खडेबाजार परिसरात मोठी गर्दी होती. कपडे, खाद्यपदार्थ, सुकामेवा, मसाले, गृहोपयोगी साहित्य यांचे स्टॉल मांडण्यात आले होते. शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल दिसून आली. केवळ बेळगाव शहरातच नाही तर अनगोळ, वडगाव, आझमनगर, न्यू गांधीनगर, अमननगर परिसरात रमजान ईदचा उत्साह दिसून आला. वक्फ बोर्डच्या सुधारणा विधेयकाविरोधात दंडाला काळ्या पट्ट्या बांधून काहींनी निषेध व्यक्त केला. बेळगाव उत्तरचे आमदार असिफ ऊर्फ राजू सेठ यांनी ईदगाह मैदान येथे उपस्थिती दर्शवून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, माजी आमदार फिरोज सेठ, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मनपातील विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









