पंतप्रधानांच्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा : वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ काही ठिकाणी काळ्या पट्ट्यांचा वापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात आली. ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ईदचा सण आपल्या समाजात आशा, सौहार्द आणि दयाळूपणाची भावना वाढवो. तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये तुम्हाला आनंद आणि यश मिळो. ईदच्या शुभेच्छा!’ अशी पोस्ट पंतप्रधानांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
देशभरातील प्रमुख मशिदींमध्ये सकाळी 6 वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली, ज्यामध्ये समाजातील हजारो लोक सहभागी झाले होते. नमाजानंतर, समुदायातील लोकांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलेही एकमेकांना आलिंगन देतानाचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते.
वाराणसीच्या जामा मशिदीत एकाच वेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव पोहोचले होते. प्रचंड गर्दीमुळे सर्व लोकांना मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जागा मिळाली नाही. यानंतर काही लोकांनी पायऱ्यांवर ईदची नमाज अदा केली. देशभरात अनेक ठिकाणी वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ काळ्या पट्ट्या बांधून लोक नमाज अदा करण्यासाठी पोहोचले होते. तामिळनाडूतील त्रिची येथे मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्यावर नमाज अदा केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईदच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाटण्यातील गांधी मैदानावर पोहोचले. भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी दिल्लीतील संसद मार्गावरील मशिदीत नमाज अदा केली.









