हल्ल्यामागे राजकीय षडयंत्राचा आरोप : पोलिसांच्या आशीर्वादाने मास्टरमाईंड मोकाट
प्रतिनिधी/ पणजी
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना अखेर 24 दिवसानंतर गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयाबाहेर येताच पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांवर आगपाखड केली. यांच्यामुळेच आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिस यंत्रणा पूर्णपणे सरकारच्या दावणीला बांधलेली असून आपणाला योग्य ते सहकार्य पोलिसांकडून मिळत नाही. राजकारण्यांच्या दबावामुळे खऱ्या मास्टर माइं&डलाही शोधण्याचा प्रयत्न करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना अटक केल्यास आपल्याला न्याय मिळेल, असे रामा काणकोणकर म्हणाले. पोलिसांनी संशयितांना अटक करण्यापासून ते आपली जबानी नोंद करण्यापर्यंत खऱ्या सूत्रधारांना सहज मोकळे करता येईल याची तजवीज केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासकामावर आपला विश्वास नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तिसऱ्या एजन्सीने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्यावर झालेल्या हल्ल्याची पोलिसांना पूर्वकल्पना होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. हा हल्ला वैयक्तिक कारणातून नसून, गोव्याच्या हितासाठी आवाज उठवल्यानेच झाल्याचे काणकोणकर यांनी म्हटले आहे. आपल्यावर हल्ला होण्याअगोदर आपण गोव्यातील विविध विषयांवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात एक व्हिडिओ काढून व्हायरल केला होता. त्यानंतर आपल्याला अटक करून सुटका झाली होती. त्यानंतर काही दिवस पोलिस स्थानकावर हजेरी लावण्याची अट घालण्यात आली होती. याच दरम्यान आपल्यावर दोनवेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत आपण पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नव्हती. उलट आपल्याबाबतची माहिती हल्लेखोरांना मिळावी असेच
पोलिसांनी’ अप्रत्यक्षपणे प्रयत्न केल्याचा आपला संशय आहे, असा आरोप काणकोणकर यांनी केला आहे. एकंदरित सारा प्रकार पाहता आपल्यावर झालेला हल्ला हा राजकारणामुळे झाला असून त्यात दोन मंत्र्यांचा हात असण्याचा संशय काणकोणकर यांनी व्यक्त केला आहे. त्याच मंत्र्यांच्या दडपणाखाली पोलिस हल्ला प्रकरणाचा तपास करीत नसल्याने आपल्याला न्याय मिळणे शक्य आहे का? असा प्रश्न काणकोणकर यांनी उपस्थित केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी आपली जबानी नोंद करण्यात आली. आपली जबानी नोंद होण्याअगोदरच पोलिस अधीक्षक पत्रकारांना माहिती देतात की आपल्यावर झालेला हल्ला हा वैयक्तिक दुश्मनीतून झाला आहे. हा सारा प्रकार पाहिल्यास पोलिसही खऱ्या संशयितांना उजेडात आणू पाहत नसल्याचे दिसून येते.
खरे सूत्रधार कळणे कठीण नाही
हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडो’ आणि ‘राखणदार’ असे शब्द वापरले. ते माझ्या तोंडावर आणि डोक्यावर बुक्के मारत होते, चक्कर येऊन खाली पडल्यावर आपल्या तोंडात शेण घालण्यात आले. तुला गोव्याचा राखणदार व्हायचे आहे का?, आमच्या आमदाराचे नाव खराब करतोस का?, तुला एसटी पोर्टफोलिओ हवा आहे का? असे प्रश्न विचारत हल्लेखोर मारहाण करत होते, ही सर्व माहिती आपण आपल्या जबानीत दिली आहे. त्यामुळे हा सारा प्रकार पाहिल्यास आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोण खरे सूत्रधार ते कळणे कठीण नाही, असे काणकोणकर यांनी म्हटले आहे.
नियोजनबद्ध हल्ला झाल्याचा आरोप
आपल्यावर झालेला हल्ला हा सहा महिने नियोजन करून झाला असावा, असे वाटते. या हल्ल्यामागे वैयक्तिक दुश्मनी नाही. 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी माझा सुमारे तीन तास जबाब नोंदवला, ज्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. मात्र, त्याची प्रत अद्याप मिळालेली नाही, असे काणकोणकर म्हणाले. हल्लेखोर कोण होते, ते काय म्हणाले आणि हल्ला कसा झाला, याची संपूर्ण माहिती जबाबात दिली असून, यामागील मुख्य सूत्रधाराचा (मास्टरमाईंड) पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.









