ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अयोध्येत उभारण्यात येत असलेले राम मंदिर उध्वस्त करुन पुन्हा त्या जागी बाबरी मशीद बांधणार असल्याची प्रतिज्ञा आंतरराष्ट्रीय जिहादी गटाने केली आहे. तसेच भारतीय मुस्लिमांनाही त्यांनी जिहादला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या गझवा-ए-हिंद या नियतकालिकात याबाबतचा उल्लेख आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गझवा-ए-हिंद या नियतकालिकाने नुकताच आपला 100 पानी अंक प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अयोध्येत बांधण्यात येत असलेले राम मंदिर पाडून पुन्हा आम्ही त्याजागी बाबरी मशीद बांधले जाईल. अल कायदाने या मासिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही गरळ ओकली आहे. त्यावरुन हे लिखाण भारतीय वातावरणाशी परिचित असलेल्या कोणीतरी लिहिले असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : …त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच
दरम्यान, अल कायदाने भारतीय मुस्लिमांनाही जिहादला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. भारतीय मुस्लिमांनी भौतिक हानीची भीती बाळगू नये. यापूर्वी आपण जीवित आणि वित्तहानी सहन केली आहे. या जीवितांचा जिहादसाठी वापर झाला असता तर एवढी हानी झाली नसती. बाबरी मशीद 30 वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. तर, 20 वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादमध्ये गर्भवती महिलांसह त्यांच्या मुलांचा शिरच्छेद करून त्यांना जाळण्यात आलं आणि आज सर्वत्र बुलडोझर चालवले जात आहेत, असेही या मासिकात अल कायदाने म्हटले आहे.









