उच्च न्यायालयाकडून मिळाला दिलासा : अन्य गुन्ह्यांमुळे तुरुंगातच रहावे लागणार
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणाच्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीमला मंगळवारी उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. डेऱ्याचे माजी व्यवस्थापक रंजीत सिंह हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या राम रहीमची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. सीबीआय न्यायालयाने याप्रकरणी राम रहीम समवेत पाच जणांना दोषी ठरविले होते. परंतु आता उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा हा निर्णय पालटविला आहे. साध्वींवरील बलात्कार तसेच पत्रकाराच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आल्याने राम रहीम तुरुंगातच राहणार आहे.
10 जुलै 2002 रोजी डेरा सच्चा सौदाच्या कमिटीचे सदस्य आणि व्यवस्थापक रंजीत सिंह यांची हत्या करण्यात आली होती. 2021 मध्ये याप्रकरणी 19 वर्षांनी सीबीआय न्यायालयाने राम रहीम आणि अन्य चार जणांना दोषी ठरविले होते. तर आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा प्रमुख राम रहीम समवेत सर्व दोषींची मुक्तता केली आहे.
तपासात अनेक त्रुटी
उच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपासायत अनेक त्रुटी असल्याचे आणि हत्येकरता वापरण्यात आलेले शस्त्र तसेच कार सीबीआयला हस्तगत करता आली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक साक्षीदारांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती असल्याचे सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नमूद केले होते.
सीबीआयला सोपविला होता तपास
रंजीत सिंह हत्येप्रकरणी पहिल्यांदा पोलिसांनी तपास केला होता. परंतु याबाबत असमाधानी असलेले रंजीत सिंह यांचे पुत्र जगसीर सिंह यांनी जानेवारी 2003 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय तपासाची मागणी केली होती. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी 2007 मध्ये न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. परंतु प्रारंभी याप्रकरणी आरोपींच्या यादीत राम रहीमचे नाव सामील नव्हते. 2006 साली राम रहीमचा चालक खट्टा सिंहच्या जबाबानंतर त्याचे नाव आरोपींमध्ये सामील करण्यात आले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये डेरा प्रमुखासमवेत 5 जणांना दोषी ठरविण्यात आले होते.









