रामभक्तांचा उत्साह : कलापथकांचे सुंदर सादरीकरण
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे रविवारी शहरात रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. यामध्ये हजारो रामभक्त उत्साहात सहभागी झाले होते. प्रारंभी आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्रीराम मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, कपिलेश्वर उड्डाण पूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सांगता झाली. विशेषत: मिरवणुकीत भव्य प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्याबरोबरच भजनी मंडळ आणि कलापथकांनी सुंदर सादरीकरण केले. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणच्या वेशभूषेत बालकलाकार सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळाही आकर्षक ठरत होता. तसेच रामभक्त हनुमान, बसवेश्वर यांच्या मूर्तीही सजविण्यात आल्या होत्या. या शोभायात्रेने शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. जय श्रीराम, जय जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या शोभायात्रेमध्ये आबालवृद्धांसह हजारो रामभक्त सहभागी झाले होते.










