राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट रचण्याचा बहुमान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल (वय 68 वर्षे) यांचे शुक्रवारी निधन झाले. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट कामेश्वर चौपाल यांनी रचली होती. राम मंदिर निर्माणासाठीच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना हा बहुमान देण्यात आला होता. ते बिहारमधील सुपौल येथील रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) कामेश्वर चौपाल यांना पहिल्या कारसेवकाचा दर्जा दिला होता. त्यांनी 9 नोव्हेंबर 1989 रोजी अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या पायाची पहिली ‘रामशिला’ (वीट) रचली होती. त्यावेळी ते विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) स्वयंसेवक होते. कामेश्वर चौपाल 1982 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे सदस्य बनले. 1989 मध्ये त्यांना गया येथे मुख्यालय असलेले विहिंपचे राज्य प्रभारी बनवण्यात आले. 1991 मध्ये त्यांनी विश्व हिंदू परिषद सोडून भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. पक्षाने त्यांना संसदीय निवडणूक लढवायला लावली. मात्र, त्यांचा पराभव झाला. तथापि, ते 2002 ते 2014 पर्यंत दोनदा विधान परिषद सदस्य राहिले होते.









