विभागस्तरावर चित्रकला स्पर्धेत मिळविले यश
कुडाळ –
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य ,पुणे व भारत सरकार यांच्या विद्यमाने मिरज येथे आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सवात सिंधुदुर्गातील ओरोस येथील छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाचा (किर्लोस ) विद्यार्थी व चित्रकार राम सूर्यकांत बिबवणेकर ( रा.बिबवणे, ता.कुडाळ ) याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात निवड झाली आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल रामचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी आणि नेहरू युवा केंद्र (सांगली ) यांचा संयुक्त विद्यमाने ओरोस जिल्हा स्तरीय युवा महोत्सव 2024 मध्ये रामने सहभाग घेऊन चित्रकला स्पर्धेत त्याने सिंधुदुर्ग जिह्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्याची निवड विभागस्तरीय युवा महोत्सवात करण्यात आली होती. यात एकूण पाच विभाग सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग विभागातून चित्रकला स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या रामने द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या कलेची छाप पाडली आहे. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले. या यशानंतर आता त्याची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात निवड झाली आहे. या यशाबद्दल छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर तसेच प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थांनी त्यांचे अभिनंदन केले. राम या महाविद्यालयात बीएससी अँग्रीकल्चरचे शिक्षण घेत आहे. बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयात त्याने दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्याला चित्रकलेची फार आवड होती.त्यावेळचे या विद्यालयाचे कलाशिक्षक विलास मळगावकर यांच्याकडून चित्रकलेचे धडे घेतले. त्यानंतर त्याने अतिशय मेहनतीने या कलेत स्वतःला वाहून घेतले. आपल्या कला कौशल्याने त्याने कुंचल्यातून रेखाटलेली चित्रे नजरेत भरतात. त्याने चित्रकला स्पर्धामध्ये सहभाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. परतू तो जिद्दीने बीएससी अँग्रीकल्चरचे शिक्षण घेत असून चित्रकलेची आवडही जोपासत आहे. त्याचीं जिद्द व पेंटिंग मधील भरारी पाहून त्याचे कला मार्गदर्शक व सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री मळगावकर यांच्यासह विविध स्तरातील व्यक्तींकडून त्याचे कौतुक होत आहे.









