वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्लोव्हाकियामध्ये झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीमध्ये भारताचा धावपटू राम बाबूने पॅरीस ऑलिंपिकसाठीची पात्रता मर्यादा पार केली आहे. त्याने या स्पर्धेत एक तास 20 मिनिटे असा कालावधी घेतला. यापूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राम बाबूने 35 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कास्यपदक मिळविले आहे. पॅरीस ऑलिंपिक पात्रतेसाठी 1 तास, 20 मिनिटे आणि 10 सेकंदाची मर्यादा ठेवण्यात आली होती. 24 वर्षीय राम बाबूने ही मर्यादा ओलांडत तिसरे स्थान मिळविले. पेरूच्या सिझर रॉड्रिग्जने 1 तास 19 मिनिटे 41 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान तर इक्वेडोरच्या ब्रायन पिनाटेडोने 1 तास 19 मिनिटे 44 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान पटकाविले. या क्रीडा प्रकारात ऑलिंपिक पात्रता फेरीची मार्यादा ओलांडणारा राम बाबू हा सातवा धावपटू आहे. यापूर्वी आकाशदीप सिंग, सुरज पनवार, सर्वीन सेवेस्टीयन, अर्शप्रितसिंग, प्रेमजित बिस्त आणि विकास सिंग यांनी असा पराक्रम केला होता. महिलांच्या विभागात पॅरीस ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारी प्रियांका गोस्वामी ही भारताची एकमेव महिला धावपटू आहे.









