पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील बैठकीत निर्णय, आदीवासी महिलेला मिळणार सर्वोच्च मान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून निवड केली आहे. त्या निवडून आल्यास आदीवासी समाजातील प्रथम महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळवितील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येथे मंगळवारी पार पडलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून भाजपसमोर 20 नावे होती. सविस्तर चर्चेनंतर द्रौपदी मुर्मू यांची निश्चिती करण्यात आली. अशा प्रकारे प्रथम पूर्व भारतातील व्यक्तीची निवड राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून करण्यात आली. आहे. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंग, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी इत्यादी नेते उपस्थित होते.
उमेदवार म्हणून त्यांची निवड झाल्याची घोषणा बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली. ही बैठक येथील भाजपच्या मुख्यालयात पार पडली. विचाराधीन असलेल्या प्रत्येक नावावर चर्चा करुन अंतिमतः द्रौपदी मुर्मू यांची निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक येत्या 18 जुलैला होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार तसेच सर्व विधानसभांचे आमदार हे या निवडणुकीतील मतदार असतात.
अल्पपरिचय
द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असून त्या आदीवासी संथाल समाजातील आहेत. त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. राज्यपाल पदावर सलग पाच वर्षे राहिलेल्या झारखंडच्या त्या प्रथमच राज्यपाल होत्या. त्यांचा जन्म 20 जून 1958 या दिवशी ओडिशातील मयूरभंज जिल्हय़ाच्या बैदापोसी या ग्रामी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बैरांची नारायण तुडू असे आहे.
त्यांचे शिक्षण बी.ए. (कलाशाखेतील पदवी) पर्यंत झाले आहे. त्यांचा विवाह श्यामचरण मुर्मू यांच्याशी झालेला होता. त्यांना दोन पुत्र आणि एक कन्या अशी अपत्ये होती. तथापि, एका दुर्घटनेत त्यांचे पती आणि दोन्ही पुत्र यांचा मृत्यू झाला होता. व्यक्तीगत आयुष्यातील हा भीषण धक्का पचवून त्या समाजसेवा सातत्याने करीत आहेत. 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 या कालावधीत त्या ओडीशातील बिजू जनता दल आणि भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारमध्ये व्यापार आणि वाहतूक राज्यमंत्री होत्या. त्यानंतर 6 ऑगस्ट 2002 पासून 16 मे 2004 पर्यंत त्या त्याच मंत्रिमंडळात मस्यपालन आणि पशुसंपदा विकास राज्यमत्री होत्या. ओडीशातून रायरंगपूर विधानसभा मतदारसंघच्या त्या प्रतिनिधी होत्या.









