नितीश कुमारांकडून पंतप्रधान मोदी लक्ष्य :
वृत्तसंस्था/ पाटणा
बेंगळूरमधील विरोधी पक्षांची बैठक अन् आघाडीला मिळालेल्या नव्या नावानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पाटणा येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने अनेक वर्षांपासून रालोआची बैठक आयोजित केली नव्हती. 2017 मध्ये आम्ही रालोआत सामील झालो होतो, त्यानंतरही बैठक झाली नव्हती. आम्ही विरोधी पक्षांच्या आघाडीत झालो झालो आणि विरोधी पक्ष एकजूट झाल्याने भीतीपोटी मोदी आता रालोआची बैठक घेत असल्याची टीका नितीश कुमार यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रालोआच्या बैठकीत ज्या पक्षांचा नामोल्लेख केला, त्यांना कुणीच ओळखत नाही. भाजपचे नेते आता देशाचा इतिहास बदलू पाहत आहेत. महात्मा गांधी यांचे स्मरण करण्याची त्यांची इच्छा नसल्याने आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो असा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांच्या मदतीने भाजप जुन्या गोष्टी आठवणीत राहू देणार नाही. परंतु देशाचा इतिहास बदलू दिला जाणार नाही, कारण विरोधी पक्ष आता एकजूट झाला असल्याचे उद्गार नितीश यांनी पाटणा येथील कारगिल चौक स्मृती उद्यानात कारगिल दिनानिमित्त हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिल्यावर प्रसारमाध्यमांनी बोलताना काढले आहेत.
मणिपूर हिंसेवरूनही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. मणिपूरमध्ये अत्यंत मोठी घटना घडली. महिलांना विर्वस्त्र करण्यात आले तरीही पंतप्रधान मोदी मौन बाळगुन आहेत. पंतप्रधानांनी बोलायला हवे, परंतु ते बोलणेच टाळत असल्याची टीका नितीश कुमार यांनी केली आहे.
बिहारपासून अन्य ठिकाणी विरोधी पक्षांची बैठक झाली आहे. भविष्यातही बैठक होत राहणार आहे. देशाच्या हिताकरता काम केले जातेय. आता कुणी कुठून लढावे याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आमची सूचना आहे. तयार केले जाणारे धोरण अन् देशहिताच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे नितीश म्हणाले.









