वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरची राजधानी इंफाळमध्sय अफ्स्पा पुन्हा लागू करण्याच्या आणि जिरीबाममध्ये झालेल्या 6 जणांच्या हत्येच्या विरोधात शेकडो लोकांनी रॅली काढली आहे. ही रॅली पश्चिम इंफाळाच्या थाउ मैदानातून सुरू होत लॅम्पक स्टेडिअमपर्यंत आयोजित करण्यात आली. निदर्शकांनी हातात फलक झळकवून मणिपूरला नष्ट करू नका, मणिपूरला वाचवा अशा मागण्या केल्या आहेत. तसेच निदर्शकांनी अफ्स्पा हटविण्याची मागणी केली आहे.
ऑल मणिपूर युनायटेड क्लब्स ऑर्गनायजेशन, पोइरेई लीमारोल मीरा पैबी अपुनबा मणिपूर, ऑल मणिपूर महिला स्वैच्छिक संघ, मानवाधिकार समिती आणि मणिपूर स्टुडंट्स फेडरेशनकडून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मणिपूरचे लोक राज्यात अफ्स्पा लागू करण्यासह कुकी उग्रवाद्यांकडून करण्यात आलेल्या महिला आणि मुलांच्या हत्येच्या विरोधात ठामपणे उभे ठाकले आहेत. इंफाळ खोरे आणि नागा क्षेत्रांमध्sय अफ्स्पामुळे मोठे नुकसान झाले आहे. उग्रवादाच्या विरोधात लढण्याच्या नावाखाली नागरिकांना ठार करण्याचे हे एक उपकरण असल्याचा दावा निदर्शकांनी केला आहे.
तर रॅली पाहता राजधानी इंफाळमधील सुरक्षा वाढविण्यात आली होती. केंद्र सरकारने अलिकडेच मणिपूरच्या सहा पोलीस स्थानकांच्या हद्दीत अफ्स्पा पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.









