जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 15.5 फूट पाण्याची आवश्यकता
वार्ताहर/तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. दिवसभर झालेल्या पावसामुळे पाणी पातळीतील सकाळच्या साठ्यात सायंकाळी अर्धा फुटाने वाढ झाली. सोमवारी सकाळी 23.9 मि.मी. पावसाची नोंद झाली तर यावर्षी आतापर्यंत एकूण 689.2 मि. मी. पावसाची नोंद झाली. जलाशयाची पाणीपातळी 2459 फूट इतकी झाली. यामध्ये अर्धाफुटाने वाढ झाल्याने एकूण पाणीपातळी 2459.50 फुटावर गेली आहे. दि. 16 जून रोजीच्या 2452.80 फूट पाणीपातळीत 8 दिवसांत 7 फुटाने वाढ झाली आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता 15.5 फूट पाण्याची आवश्यकता आहे. जलाशयातील एकूण पाणीसाठा 13.50 फूट इतका शिल्लक आहे. मागीलवर्षी पाणीपातळी ही 2451.45 फुटावर तर एकूण पाऊस 323 मि.मी. इतका झाला होता. जलाशयाला मिळणाऱ्या मार्कंडेय नदीपात्र आणि जांभूळ ओहळ नाल्यातून पाण्याचा प्रवाह वाढला आहे.










