जलाशयाची पातळी 2475 फूट : शहरवासियांना पाणीपुरवठा सुरळीत होणार
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणारा राकसकोप जलाशय दोन आठवडय़ापूर्वी भरल्याने पाणी मार्कडेय नदीत सोडण्यात आले होते. पण पावसाचा जोर ओसरल्याने दरवाजे बंद करण्यात आले होते. पण आता राकसकोप जलाशयाची पातळी 2475 फूट झाल्याने पूर्ण क्षमतेने काठोकाठ भरला आहे. आता शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
जून महिन्यामध्ये राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने डेड स्टोरेज मधील पाणी उपसा करण्याची वेळ आली होती. मात्र पावसाचा जोर वाढल्याने मार्कंडेय नदी प्रवाहित झाली. त्यामुळे राकसकोप जलाशय केवळ आठ दिवसांतच तुडुंब भरले. पावसाचा जोर वाढल्याने जलाशयाची पाणीपातळी वाढली. परिणामी जलाशयाचे दोन दरवाजे खुले करून अतिरिक्त पाणी मार्कंडे नदीत सोडण्यात आले. त्यामुळे पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला होता. नदीकाठावरील शेतकऱयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र याच दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने राकसकोप जलाशयाचे दरवाजे बंद करण्यात आले. मागील आठवडय़ापासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे. तसेच मार्कंडेय नदीचा प्रवाह देखील कमी झाला होता. मात्र सध्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2475 फूट झाली असून जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची समस्या मिटली आहे. केवळ आठ दिवसांच्या पावसात राकसकोप जलाशय पूर्णपणे भरला. पाणीसाठा कमी झाल्याने सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीपुरवठा आता सुरळीत होणार आहे.









